अमेरिकेत नोकरीच्या शोधात गेलेल्या तेलंगणमधील दोन तरुणींचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका भीषण रस्ते अपघातात तेलंगणातील दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत सहलीवरून परतत असताना हा अपघात झाला. पुल्लाखंडम मेघना राणी आणि कडयाला भावना अशी या 24 वर्षीय मृत तरुणींची नावे आहेत. या दोन्ही तरुणी उच्च शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत नोकरीच्या शोधात गेल्या होत्या. मात्र परदेशात नोकरी करण्याचं त्यांच स्वप्न स्वप्नंच राहिलं.

मेघना आणि भावना या मुळच्या तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील गर्ला मंडळातील रहिवासी होत्या. मेघना आणि भावना या दोघींनीही आपले पदव्युत्तर शिक्षण (Master’s degree) पूर्ण केले होते. मेघना, जिला प्रेमाने ‘चिक्की’ म्हटले जायचे, ती काही काळापूर्वीच अमेरिकेला गेली होती. मेघनाचे वडील गर्ला येथे ‘मी-सेवा’ केंद्र चालवतात, तर भावनाचे वडील मुलकनूर गावाचे उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. या दोन तरुण मुलींच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणी आपल्या मित्रांसह सहलीसाठी गेल्या होत्या आणि तिथून परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाने या अपघाताचा तपास सुरू केला असून घटनेचे नेमके कारण शोधले जात आहे. या हृदयद्रावक घटनेची बातमी तेलंगणातील त्यांच्या मूळ गावी पोहोचताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या या दोन्ही तरुणींचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि मित्र प्रयत्न करत आहेत.

Comments are closed.