कोकण तापले, उन्हाच्या झळांनी अंगाची लाही लाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यंदाचा उन्हाळा घामटा आणणारा ठरत असून गरम वाऱ्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. ठाणे, अलिबाग व पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस पारा वाढत चालला असून भातसानगर येथे तर पारा ४३ अंशांवर जाऊन पोहोचला. येत्या तीन ते चार दिवसांत हा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कडक उन्हामुळे अवघे कोकण तापले असून सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे दिसत आहे. उन्हाच्या पाऱ्यावर हवामान विभागाचे तज्ज्ञ २४ तास वॉच ठेवत आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच दुपारच्या वेळेस घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.

पालघर जिल्ह्यातील तापमान

  • डहाणू – 37
  • पालघर – 39
  • तलासरी – 40
  • विक्रमगड – 41
  • जव्हार – 39
  • मोखाडा – 38
  • वाडा – 41
  • वसई – 37
  • भातसानगर – ४३
  • चिपळूण – 42
  • मुंब्रा – ४२
  • मनोर – 42
  • खारघर – 41

रायगड जिल्ह्यातील तापमान

  • पनवेल – 35
  • उरण – 33
  • कर्जत – 35
  • खालापूर – 36
  • सुधागड – 36
  • पेण – 33
  • अलिबाग – 32
  • मुरुड – 31
  • रोहा – 33
  • तळा – 34
  • म्हसळा – 32
  • श्रीवर्धन – 31
  • माणगाव – 35
  • महाड – 33
  • पोलादपूर – 34

माठाने भाव खाल्ला

यंदाच्या उन्हाळ्यात बाजारपेठेमध्ये माठांना मागणी वाढली असून त्याचे भावही वधारले आहेत. लाल माठ तीनशे रुपयांपासून पुढे विकला जात असून काळ्या माठाची किंमत चारशे ते साडेचारशेवर जाऊन पोहोचली आहे. पाण्यात टाकण्यासाठी लागणारा वाळादेखील 25 ते 30 रुपयांना विकला जात आहे.

सर्वोच्च तापमान

कोकणात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून अनेक शहरांमधील पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. भातसानगर येथे तर पारा 43 वर जाऊन पोहोचला. यंदाच्या मोसमातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली.

दुसऱ्या दिवशीही लाट कायम

कोकण किनारपट्टीपासून थोड्या अंतरावर असलेल्या भागांमध्ये कोरड्या उष्णतेचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याचे मोडक यांनी स्पष्ट केले. किनारपट्टीपासून जवळ असलेल्या अनेक शहरांमध्ये तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंश सेल्सियसने अधिक नोंदवले गेले तर सलग दुसऱ्या दिवशी कोकणात कोरड्या उष्णतेची तीव्र लाट कायम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Comments are closed.