टेम्पो ट्रव्हलर्स मोरीवर आदळून अपघात, गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमानी जखमी
राजापूर तालुक्यातील हातिवले नजीक हॉटेल शिवानंद समोर कुर्ला येथून मालवण कुणकवळे येथे जाणार्या टेम्पो ट्रव्हलर्सच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीवर आदळून अपघात झाला. अपघातात टेम्पो ट्रव्हलर्स मधील चालकासह 16 प्रवासी जखमी झाले आहेत. या टेम्पो ट्रव्हलर्स मधील सर्व प्रवाशी हे एकाच कुटुंबातील असून यातील दहा जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. तर उर्वरित सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मुंबई कुर्ला येथील देसाई कुटुंबीय टेम्पो ट्रव्हलर्सने गणेशोत्सवासाठी मालवण कुणकवळे येथे जात होते. टेम्पो ट्रव्हलर्स ( गाडी. क्र. डीडी 01 एजी 9573) हा चालक अक्षय सुनिल यादव (वय 30 रा. रहिमतपुर) हा चालवत होता. मुंबई गोवा महामार्गावर हातिवले हॉटेल शिवानंद जवळ गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाहेर जाऊन मोरीवर आदळली व हा अपघात झाला. या अपघातात चालक अक्षय यादव याच्यासह सर्व प्रवाशी जखमी झाले. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातात गंभीर जखमीं झालेल्या प्रवाशांमध्ये चालक अक्षय सुनिल यादव (वय 30 रा. रहिमतपूर) यासह सखाराम महादेव देसाई (वय 68) शशिकांत नारायण देसाई (वय 47), सुषमा सखाराम देसाई (वय 65), राकेश सखाराम देसाई (वय 38), रूचा राजेश देसाई (वय 35), आयाध्य राजेश देसाई (वय 4), सतोष महादेव देसाई (वय 53), स्नेहल संतोष देसाई (वय 45), विनिती राकेश देसाई (वय 35) सर्व रा. कुर्ला मुंबई, यांचा समावेश आहे. यांतील सहा जणांना फॅक्चर असून चार जणांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर किरकोळ जखमींमध्ये चिन्मय संतोष देसाई (वय 18), जान्हवी संतोष देसाई (वय 20), तिर्था राकेश देसाई (वय 2), उर्मिला उल्हास देसाई (वय 52), भक्ती उल्हास देसाई (वय 26) सर्व रा. कुर्ला मुंबई यांचा समावेश आहे. या सर्वांवर राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र सर्व एकाच कुटुंबातील असल्याने ज्या गंभीर जखमी रूग्णांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत पाठविण्यात आले. त्यांच्यासोबतच हे किरकोळ जखमी असलेले सर्व रूग्ण देखील रत्नागिरीत गेल्याचे डॉक्टर राम मेस्त्री यांनी सांगितले.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील, सागर खंडागळे व सहकार्यानी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तात्काळ जखमींना रिक्षा चालक संतोष सातोसे, नाना कुवळेकर यांनी राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी स्थानिक पोलीस पाटील श्री. धालवलकर यांसह ग्रामस्थांनीही जखमींना रूग्णालयात आणण्यास सहकार्य केले. तर महामार्गावर जाणार्या वाहन चालकांनी व प्रवाशांनीही यावेळी मदत केली.
राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. राम मेस्त्री, डॉ. आर्यन, डॉ. प्रसन्न, डॉ. स्नेहल यांसह स्टाफ बोरकर, नाटेकर व त्यांच्या सहकार्यांनी जखमींवर तात्काळ उपचार केले. यातील काहींना फॅक्चर झाले व काहींच्या डोक्याला दुखापत झाली असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकिय रूग्णालयात पाठविण्यात आल्याचे डॉ. मेस्त्री यांनी सांगितले. या अपघाताची माहिती मिळताच उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी घटनास्थळी भेट दिली व पहाणी केली. चालक नाना कुवळेकर, गणेश सुद, विकास सावंत यांनीही जखमींना उपचारासाठी आणणे व अधिक उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यात मोलाचे सहकार्य केले. पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मुबीन शेख, पोलीस हे.कॉ. नम्रता नामये आदींसह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी तसेच रूग्णालयात धाव घेत जखमीना मदत केली
Comments are closed.