साधूच्या मृत्यूवरून मथुरेत तणाव

गो-तस्करांनी ट्रकखाली चिरडल्याचा आरोप : जमावाच्या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनांचे नुकसान

वृत्तसंस्था/ मथुरा

मथुरेत साधू चंद्रशेखर सिंग (45) यांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला. ट्रकखाली चिरडून मृत्यू पावलेल्या बाबा चंद्रशेखर महाराज यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर मथुरेतील छाटा येथे गोंधळ उडाला. संतप्त लोकांनी महामार्ग अडवला आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोतस्करांनी त्यांना आपल्या वाहनाखाली चिरडून ठार केल्याचा आरोप आहे.

चंद्रशेखर सिंग हे ‘फरसा वाले बाबा’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनंत सर्वत्र संतापाची लाट उसळली. संतप्त लोकांनी बाबांचा मृतदेह महामार्गावर ठेवत वाहतूक रोखून धरली.  यावेळी त्यांनी दिल्ली महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या संघर्षामुळे घबराट पसरली. दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. पोलिसांनी संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु जमावाने दगडफेक करून पोलिसांनाही सळो की पळो करून सोडले.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा चंद्रशेखर आपल्या टीमसोबत कोसिकलन पोलीस ठाण्याच्या कोतवान चौकी परिसरातील नवपूर गावाजवळ बाईकवरून गोतस्करांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत होते. तस्करांनी कथितरित्या वेग वाढवून बाबांच्या बाईकवरून ट्रक चालवल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली.

बाबा चंद्रशेखर हे अंजनोख गावचे रहिवासी होते आणि त्यांच्या शौर्यासाठी व गायींच्या संरक्षणासाठी ब्रजमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच, हजारो गोभक्त आणि गावकरी श्रद्धांजली वाहण्यासाठी गोशाळेत जमले. हिंदू संघटना आणि गोरक्षक तीव्र संतप्त झाले आहेत. एका संतप्त जमावाने आग्रा-दिल्ली महामार्ग अडवत दगडफेक सुरू केल्यानंतर तणाव आणखीनच वाढला होता. ईदच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संवेदनशीलतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा मृत्यू अपघात होता की पूर्वनियोजित हत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed.