आखाती देशामध्ये तणावाचे वातावरण, इराणच्या हल्ल्यांनंतर आता युएई सौदी सज्ज
गल्फमध्ये वाढत असलेल्या तणावामुळे ईराण कडून आलेल्या मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता युएई आणि सौदी अरेबिया सज्ज झाले आहेत. या दोन्ही देशांनी आता देशांतर्गत सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. याच धर्तीवर रविवारी युएई ने आपल्या एअर डिफेन्स प्रणालीने काही ड्रोन अडविल्याचे सांगितले. तसेच देश कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.
सौदी अरेबियानेही इराणला कडक इशारा देत हल्ले सुरू राहिल्यास त्याचा सर्वात मोठा तोटा इराणलाच सहन करावा लागेल, असे म्हटले आहे. सौदी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, देशाच्या उत्तर भागातील अल-जौफ प्रदेशाच्या पूर्वेकडे लक्ष्य केलेला एक ड्रोनही अडवण्यात आला.
दरम्यान युएईचे राष्ट्राध्यक्ष मोहमेद बिन झाएद अल नाह्यन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. या संभाषणात गल्फ देशांवर झालेल्या इराणी हल्ल्यांबाबत आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. तणाव वाढत असताना अमेरिकेने सावध पाऊल उचलत सौदी अरेबियातील आपल्या दूतावासातील गैर-आवश्यक कर्मचाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे सांगितले असून अमेरिकन नागरिकांना सध्या सौदी अरेबियाला प्रवास करण्याबाबत पुनर्विचार करण्याचा सल्लाही दिला आहे.
या संघर्षाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे. इराणने तेलसमृद्ध गल्फ देशांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आणि एका बॅरलची किंमत $100 च्या पुढे गेली. या घडामोडींमुळे ऊर्जा आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारात आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरण झाली आहे.
दरम्यान, इराणमध्येही मोठी राजकीय घडामोड घडली आहे. इराणी राज्य दूरदर्शनने सोमवारी पहाटे मोजतबा खामेनी यांना दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. सध्याच्या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून, या संघर्षाचे परिणाम जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.