मध्यपूर्वेतील तणावाचा विमानसेवेला फटका, एअर इंडिया-एअर इंडिया एक्स्प्रेसची उड्डाणे रद्द
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियातील तीन शहरांसाठीची विमानसेवा ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जेद्दा, दम्माम आणि रियाध या शहरांकडे जाणारी तसेच तेथून येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये प्रवासाचे नियोजन केलेल्या भारतीय प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर २०२६ किंवा त्यापूर्वी तिकीट बुक केलेल्या आणि ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवास करायचे नियोजन असलेल्या प्रवाशांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. प्रवाशांना उपलब्धतेनुसार कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवासाची तारीख बदलता येणार आहे. तसेच, तिकीट रद्द केल्यास संपूर्ण परतावा मिळणार आहे.
प्रवाशांना त्यांचा नवीन प्रवास १४ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करता येईल. एअर इंडियाच्या प्रवाशांना सौदी अरेबियातील एअर इंडियाच्या अन्य कार्यरत विमानतळांसाठी प्रवासाचे पुनर्नियोजन करता येईल. तर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवाशांना सौदी अरेबिया किंवा बहरीनमधील कंपनीच्या अन्य कार्यरत विमानतळांसाठी प्रवासाची तारीख बदलता येणार आहे.
तिकिटाची तारीख बदलणे किंवा परतावा मिळवण्यासाठी प्रवाशांना एअरलाइनच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधता येईल. – एअर इंडिया : +९१ ११ ६९३२९३३३ / +९१ ११ ६९३२९९९९ एअर इंडिया एक्स्प्रेस : +९१ १२४ ६९३५६००
Comments are closed.