कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू; 2 गंभीर जखमी
बेळगाव : सध्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याला (Kumbhmela) जाऊन गंगास्नान करण्यासाठी भाविकांची ओढ पाहायला मिळत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य नागरिक प्रयागराजला जाऊन दर्शन घेत आहे. येथील पवित्र कुंडात स्नान करुन आनंद व समाधान घेत आहे. त्यामुळेच, प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वेसेवा, रस्ते वाहतूक आणि विमानसेवेच्या बुकींगलाही सध्या वेटींगच पाहायला मिळत आहे. त्यातच, देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक स्वत: गाड्या घेऊन महाकुंभला जात आहेत. दरम्यान, या भक्तीमार्गाच्या प्रवासात अपघाताच्याही (Accident) घटना घडल्या आहेत. सोमवारी आज पहाटे आणखी एक अपघाताची घटना घडली असून या अपघातात 6 जण जागेवरच ठार झाले आहेत. तर, दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाऊन परत येत असताना मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे अपघाताची घटना घडली. टेम्पो ट्रॅक्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक तोडून पलीकडच्या रस्त्यावर गेलेल्या टेम्पो ट्रॅक्सला बसची धडक बसली. या भीषण अपघातात बेळगाव जिल्ह्यातील 6 जण जागीच ठार झाले असून दोघेजण गंभीर जखमी झाल्याची पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशांमध्ये भालचंद्र नारायण गौडर (वय 50, रा. गोकाक,) सुनील बाळकृष्ण शेडशाळ (वय 45, रा. हत्तरकी -आनंदपुर गोकाक), बसवराज निरपादप्पा कुर्ती (वय 63, रा. गोकाक), बसवराज शिवाप्पा दोडमणी (वय 49, रा. गोकाक), इराण्णा शंकराप्पा शेबिनकट्टी (वय 27, रा. गुळेदगुड्ड) आणि वीरूपाक्ष चन्नाप्पा गुमती(वय 61, रा. गोकाक) अशी नावे आहेत. तर, मुस्ताक शिंधिकुरबेट आणि सदाशिव उपदली हे अपघातात गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बसला धडक दिल्याने 6 ठार
अपघातग्रस्त गाडीचा नंबर कर्नाटक असून वाहन क्रमांक केए 49 एम 5054 ही ट्रॅक्स जबलपूरच्या दिशेने खूप वेगाने जात होती. मात्र, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावरील झाडावर आदळली. भरधाव वेगाने जाणारी गाडी नियंत्रणाबाहेर गेली, दुभाजकावरील झाड तोडून चुकीच्या बाजूला गेली आणि जबलपूरहून कटनीकडे जाणाऱ्या प्रवासी बसला कारची धडक बसली. आधी कठड्याचा अपघात, त्यानंतर बसला धडक बसल्याने या कारमधील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सिहोरा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय उपचारांसाठी जबलपूरला रेफर करण्यात आले आहे.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.