IND vs PAK: लय भारी! भारताने पाकिस्तानचा 19-0 ने केला पराभव, महिला हॉकी ज्युनियर आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये मारली धडक

चीनमध्ये महिला हॉकी ज्युनियर आशिया चषक 2026 स्पर्धा खेळली जात आहे. यामध्ये गुरूवारी (10 ऑगस्ट) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 19-0 असे पराभूत केले आणि उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
या सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये पाच आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये आणखी पाच गोल करत भारताने मध्यंतरापर्यंत 10-0 अशी भलीमोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या हाफमध्येही भारताने पाकिस्तानला गोल करण्याची एकही संधी न देता अप्रतिम खेळ केला. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये तीन आणि चौथ्या (अंतिम) क्वार्टरमध्ये सहा गोल केले. अशाप्रकारे भारताचे या सामन्यातील वर्चस्व दिसले आणि या स्पर्धेत मोठ्या विजयांपैकी एकाची नोंद केली.
पाकिस्तान या सामन्यात इतका मागे पडला होता की, गोल करणे दूरच त्यांना पेनल्टी शूटआऊट किंवा पेनल्टी कॉर्नरदेखील मिळाला नाही.
दुसरीकडे भारताच्या 19 गोलांपैकी 11 गोल मैदानी यावरून भारताचे संपूर्ण सामन्यातील चेंडूवरचे नियंत्रण दिसल्याचे कळते. विशेष म्हणजे, भारताच्या 13 वेगवेगळ्या खेळाडूंनी हे गोल केले आहेत. पूजा मलिकने हॅट्ट्रीक (27′, 49′, 51) साधली, तर रोशनी, सानिका माने, मधू सिदार आणि सुप्रिया यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
दोन वेळेचा गतविजेता भारत
गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या भारताने महिला ज्युनियर हॉकी आशिया कप 2026 मध्ये एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी एलिट पूल फेरीत चीनविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत संपवला. तसेच जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशियावर एकतर्फी विजय मिळवले.
1992 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 2015 पर्यंत चीन आणि दक्षिण कोरियाचे वर्चस्व राहिले, मात्र मागील दोन स्पर्धांमध्ये भारताने दोन्ही संघांना पराभूत करत जेतेपद पटकावले आहे.
आता पाकिस्तानविरुद्धच्या या विजयामुळे भारत महिला ज्युनियर आशिया कप विजेतेपदाची हॅट्ट्रीक पूर्ण करण्यापासून केवळ दोन विजय दूर आहे. त्यांनी 2023 आणि 2024 मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.
उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरिया आणि मलेशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील विजेत्याशी होईल.
Comments are closed.