जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा.
गांदरबलमधील शेधमोहीमेवेळी चकमक
न्यूज एजन्सी/ श्रीनगर
लष्कराने जम्मू काश्मीरमधील गांदरबल येथे बुधवारी सकाळी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ही मोहीम मंगळवार रात्रीपासून सुरू होती. विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने मंगळवारी संध्याकाळी घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली होती. गांदरबलमध्ये एक दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. अंधारामुळे ही मोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळी मोहिमेस पुन्हा प्रारंभ झाल्यानंतर चकमकीत दहशतवादी ठार झाला.
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी गांदरबलच्या जनरल अरहामा परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली. शोधादरम्यान, सतर्क जवानांना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. आव्हान दिल्यावर दहशतवाद्याने गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. दोन दहशतवादी गावात लपून बसल्याचा संशय आहे. उत्तर काश्मीरमधील गांदरबल जिल्हा आतापर्यंत दहशतवादी अस्तित्त्वापासून मुक्त मानला जात होता. अशा स्थितीत ही चकमक सुरक्षा दलांसाठी चिंतेचा विषय आहे.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांना ठार केले होते. किश्तवारच्या चत्रूमध्ये तीन दहशतवादी ठार झाले होते. 4 फेब्रुवारी रोजी सुरक्षा दलांनी चत्रूमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्यालाही ठार केले होते. त्याचप्रमाणे, उधमपूर जिह्यातील एका गुहेत लपलेले जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ग्रेनेड स्फोटात ठार झाले होते.
Comments are closed.