सणासुदीच्या आधीच दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला.
पंजाबमध्ये एके-47, हँड ग्रेनेडसह आरोपीला अटक
वृत्तसंस्था/ अमृतसर
सणांच्या काळात अमृतसरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला रविवारी अमृतसर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एके-47 रायफल, मॅगझिन, जिवंत काडतुसे आणि दोन हँड ग्रेनेड जप्त केली. प्राथमिक तपासात आरोपीचे परदेशी तस्करांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. पोलीस या नेटवर्कचे इतर दुवे, शस्त्रास्त्रांचे संभाव्य धागेदोरे आणि तांत्रिक बाबींचा तपास करत आहेत.
अटक करण्यात आलेला संशयित आरोपी परदेशी हँडलर्सच्या सूचनेनुसार अवैध शस्त्रपुरवठा मिळवण्यात सामील होता. सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणी आणि इतर सरकारी संस्थांना लक्ष्य करण्याचा कट रचला जात होता, असे तपासात उघड झाले. मात्र, हल्याच्या नियोजनापूर्वी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून हा कट उधळून लावला, असे आयजी गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी घरिंदा पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या नेटवर्कमध्ये सामील असलेल्या इतर व्यक्तींना आणि शस्त्र पुरवठ्याच्या स्रोताला ओळखण्यासाठी पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. ते परदेशी तस्करांशी असलेले त्याचे संबंध आणि नेटवर्कच्या संबंधांचाही तपास करत आहेत.
तिसरी एके-47 जप्ती
अमृतसर ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेली ही तिसरी एके-47 रायफल आहे. हँड ग्रेनेड सापडणे ही विशेष चिंतेची बाब आहे, कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ शकली असती, असे आयजी गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी सांगितले. ही कारवाई करणाऱ्या पथकामध्ये एसएसपी कंवलप्रीत सिंग चहल, एसपी (डी) रामनविंदर सिंग, डीएसपी यादविंदर सिंग (अटारी) आणि सीआयए इन्स्पेक्टर मनमीत सिंग यांचा समावेश होता. आयजींनी पथकाचे कौतुक करतानाच संबंधित तपास अधिकाऱ्यांना योग्य पुरस्कार आणि सन्मानांसाठी पंजाबचे डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली जाईल, असे स्पष्ट केले.
Comments are closed.