भारताच्या कारवायांमुळे दहशतवादी धास्तावले आहेत.
जैश-लष्कर-हिजबुल मुजाहिद्दीनकडून सदस्यांना संदेश
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
ऑपरेशन सिंदूरपासून जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटना काश्मिरींना एकत्रित करण्यासाठी प्रचार करत आहेत. भारताविरोधात कारवाया करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी भीतीमुळे त्याला वेग येईनासा झाला आहे. भारत कोणत्याही क्षणी दहशतवाद्यांवर कारवाई करू शकतो, अशी धास्ती असल्यामुळे संघटना अधिकाधिक दक्ष राहून वावरताना दिसत आहेत. भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर-2’ होण्याची शक्यता गृहित धरून विविध संघटनांकडून आपल्या सदस्यांना अलर्ट केले जात आहे.
परिस्थिती आमच्यासाठी अधिकाधिक कठीण होत चालली आहे. कोणत्याही परीक्षेचा सर्वात कठीण भाग शेवटी येतो, हे आम्हाला माहित आहे. देवाच्या इच्छेने, आम्ही विजयी आणि मजबूत होऊ. ही तुमची लढाई आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्हाला स्वत: करावे लागेल. लवकरच आम्ही कब्जा हाताळण्यासाठी एक संपूर्ण योजना उघड करू, असा संदेश काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या सदस्यांसाठी विविध दहशतवादी संघटनांकडून जारी करण्यात आलेला आहे.
तरुणांना भरती करण्याच्या आणि हल्ल्यांसाठी तयारी करण्याच्या योजना उघड करणारी मासिके आणि कागदपत्रे हस्तगत करण्यात भारतीय यंत्रणांना यश मिळाले आहे. डिसेंबरमध्ये एका दहशतवादी नेटवर्कने प्रकाशित केलेले एक मासिक प्राप्त झाले असून त्यात दहशतवादी संघटनांनी आपल्या सदस्यांना एक महत्त्वपूर्ण संदेश जारी केलेला दिसतो. हे मासिक लष्करी कारवाया आणि दहशतवाद्यांना भविष्यातील तयारींबद्दल माहिती देते. तसेच त्यात 33 वर्षांपासून फरार असलेल्या दहशतवादी जहांगीरची मुलाखत देखील समाविष्ट आहे.
Comments are closed.