भोंदूबाबा खरातसोबत फोटो असलेल्यांच्या एचआयव्ही टेस्ट करा… काँग्रेसची मागणी; विधिमंडळात विरोधक आक्रमक

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून आज विधिमंडळात विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. पुरोगामी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारी ही घटना आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी निषेध नोंदवत सरकारवर हल्ला केला. भोंदूबाबा खरातसोबत फोटो असणाऱ्यांची एचआयव्ही टेस्ट करा, खरातला भेटणाऱ्या सर्व मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घ्या तसेच या प्रकरणात आयएएस, आयपीएस आणि महसूल अधिकारीही सामील असून त्यांना सहआरोपी करा, अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली.

विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार नाना पटोले यांनी स्थगन प्रस्ताव मांडून अशोक खरात प्रकरणी चर्चेची मागणी केली. भोंदू खरातने देवाधर्माच्या नावाखाली राज्यातील महिला आणि मुलींचे लैंगिक शोषण केले. खरातचे 100 पेक्षा जास्त कारनामे आणि व्हिडीओ समोर आले आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

खरातला जे जे भेटले त्यांचे सीडीआर चेक करा – विजय वडेट्टीवार

भोंदूबाबा अशोक खरातला जे जे भेटलेत त्यांची एचआयव्ही टेस्ट करावी लागेल आणि ती सरकारने केली पाहिजे. नाहीतर ते सगळेच मरतील, असे विजय वडेट्टीवार या स्थगन प्रस्तावावर बोलताना म्हणाले. पुरोगामी महाराष्ट्रात देवाधर्माच्या नावाने भोंदू तयार होत आहेत. यात राजकीय लोक, आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत. काही महसूलचे अधिकारी आहेत. सर्वांचे सीडीआर चेक करा, अशी मागणी त्यांनी केली. खरात हा ओशोक जल म्हणून मूत्र द्यायचा आणि त्यात व्हियाग्रा टाकायचा. एका हॉटेलमध्ये तीन आयएएस अधिकारी खरातवर कारवाई होऊ नये म्हणून बसले होते. केवळ एसआयटी नेमून हे प्रकरण संपणार नाही. खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा भोंदूचे पाय धुतात. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री त्या भोंदूबाबाचे दर्शन घेतात. या प्रकरणाने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

कुणालाही सोडणार नाही – मुख्यमंत्री

विरोक्षकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले की, भोंदूबाबा अशोक खरात याने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिलांसोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या महिला समोर यायला तयार नव्हत्या. पोलिसांनी त्यांना धीर देऊन तक्रारीसाठी पुढे आणले. खरातवर कारवाई जरी आता झाली असली तरी त्याची तयारी आधीपासूनच सुरू होती. 10 मार्चला दुसऱया जिह्यातील तक्रारीचा उपयोग करून पोलिसांनी ट्रप लावला. खरात बाहेर पळू नये म्हणून त्याचा एलओसीही काढून ठेवला, असे फडणवीस यांनी सांगितले. उद्या आपण यासंदर्भात सभागृहात सखोल निवेदन करू, असे ते म्हणाले.

खरातबरोबर फोटो आलेत त्यांचे राजीनामे घ्या – नाना पटोले

भोंदू खरातबरोबर फोटो आल्याने रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला तसेच ज्यांचे ज्यांचे फोटो खरातबरोबर आलेत त्यांचे तातडीने राजीनामे घ्या, अशी मागणी यावेळी नाना पटोले यांनी केली. खरातने विधवा, गरोदर महिला आणि लहान मुलींचे शोषण केले. हा महाराष्ट्राच्या इज्जतीचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर सभागृहात चर्चा झाली नाही तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. नियम 101 अन्वये चर्चा घ्या, असे पटोले यांनी सांगितले. चर्चा होणे गरजेचे आहे.

भोंदू बुवाचे मूत्र प्यायला जाता, लाज नाही का… – भास्कर जाधव

शिवसेना गटनेते आमदार भास्कर जाधव यांनीही या मुद्दय़ावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, सरकारकडून याप्रश्नी उतर घेणे हा सभागृहाचा अधिकार आहे. या प्रकरणात आयएएस, आयपीएस पोलीस अधिकारी आहेत. सर्व पक्षांचे लोक आहेत. पावसाळ्यात असाच एक प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा सरकारने त्यात तथ्य नसल्याचे सांगितले होते. नाशिकच्या एका हॉटेलमध्ये काही मंत्री अशाच प्रकारचे कृत्य करत होते, असा संताप भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सांगायचं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून सांगायचं. आम्ही जरा काय झालं की गोमूत्र पाजायचं आणि आता मंत्री त्या बुवाचं मूत्र प्यायला जातात. लाज वाटत नाही का? ज्या छत्रपतींचे नाव घेता, त्यांनी अमावस्या कधी आहे हे पाहिले नाही, त्यांनी पौर्णिमा कधी पाहिली नाही, पितृपक्ष कधी पाहिला नाही, कधी कुडमुडय़ा ज्योतिषाकडे गेले नाहीत. गंडे, दोरे, अंगठय़ा, खडे वापरले नाहीत आणि तुम्ही हे उद्योग करता, असे भास्कर जाधव मंत्र्यांना उद्देशून म्हणाले. याविषयी सरकारने गांभीर्याने भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली.

क्लीन असतो त्यालाच मी क्लीन चिट देतो

खरातला क्लीन चिट मिळणार का असे विरोधकांनी म्हणताच, मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाहीये, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रकरणात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडले जाणार नाही, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

खरातशी संबंधित 10 मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्या – आदित्य ठाकरे

भोंदूबाबा अशोक खरातसोबत ज्यांची छायाचित्रे आहेत त्या मिंधेंसह प्रत्येकावर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केली. खरात यांच्याशी संबंध असलेल्या 9 ते 10 मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्या, त्यात उपमुख्यमंत्री असतील वा कुठलेही मंत्री असतील त्यांच्यावर कारवाई करावी. हे प्रकार महाराष्ट्रासाठी भयानक आहेत. अशा भोंदूबाबांच्या भक्तांचीही चौकशी व्हायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Comments are closed.