कसोटी पंच माधव गोठोस्कर पुरस्काराने भारावले, वयाच्या 96 व्या वर्षी गोठोस्करांनी गाजवली किश्श्यांची मैफल

आपल्या कडक शिस्तीमुळे भल्याभल्याची विकेट काढणाऱ्या माजी कसोटी पंच माधव गोठोसकरांनी वयाच्या 96 व्या वर्षीही आपल्या क्रिकेट किश्श्यांनी मैफल गाजवली. निमित्त होतं वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांचा करण्यात आलेल्या हृद्य सत्काराचं.

मुंबई क्रिकेटसाठी तब्बल 47 वर्षे अमूल्य योगदान देताना माजी कसोटी पंच, मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए)पदाधिकारी, शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवत कसोटी पंच माधव गोठोस्कर यांचा वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एमसीए आणि शिवाजी पार्क जिमखान्याच्या (एसीपीजी) पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हृद्य सत्कार करण्यात आला.

आपला सत्कार करण्यासाठी आलेल्या मुंबई क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती पाहून माधव गोठोसकर अक्षरशः भारावले. मुंबई क्रिकेटसाठी आपण दिलेल्या योगदानाप्रती एमसीएने दिलेल्या प्रेमामुळे आपण आणखी ठणठणीत झालो असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. विशेष म्हणजे शंभरीच्या उंबरठय़ावर असलेल्या गोठोसकरांनी क्रिकेट संघटकांचे प्रेम पाहून त्यांनी तब्बल तासभर आपल्या किश्श्यांनी वातावरण क्रिकेटमय केले.

जसे गोठोसकर पुरस्काराने भारावले तसेच क्रिकेट पदाधिकाऱ्यांनीही गोठोसकरांच्या 96 वर्षे वयाच्या स्मरणशक्तीलाही मानाचा मुजरा केला. आपल्या क्रिकेटमधील शिष्यांना आणि हितचिंतकांना पाहून ठणठणीत झालेल्या गोठोसकरांचा उत्साह धबधब्यासारखा ओसंडून वाहत होता. तब्बल तासभर त्यांनी आपल्या किश्श्यांनी साऱ्यांना क्रिकेटच्या आठवणींची एक सफर घडवून आणली. गोठोसकरांचा सत्कार एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अभय हडप, दीपक पाटील, सुरेंद्र हरमळकर, सीएस नाईक यांच्यासह एसपीजीचे दीपक मुरकर, संजीव खानोलकर, सुनील रामचंद्रन उपस्थित होते.

अन् झहीरला मैदानात थांबवले

1983 साली पाकिस्तानविरुद्धची बंगळुरू कसोटी अनिर्णितावस्थेकडे झुकली होती. तेव्हा कर्णधार झहीर अब्बासने सुनील गावसकरचे शतक होऊ नये म्हणून खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हा अजून पाच षटकांचा खेळ शिल्लक असल्याचे सांगून झहीरला गोलंदाजी करायला भाग पाडले आणि गावसकरने आपले कसोटी शतक पूर्ण केल्याची आठवण गोठोसकरांनी ताजी केली. तसेच वेस्ट इंडीजविरुद्धचा 1983 साली वानखेडेवर खेळला गेलेला कसोटी सामना पाच दिवस खेळवल्याबद्दल एका पारशी बाईने मानलेल्या आभाराचीही आठवण त्यांनी ताजी केली. तुम्ही हिंदुस्थानच्या पाच आणि वेस्ट इंडीजच्या पाच खेळाडूंना नाबाद ठरवल्यामुळे हा सामना पाच दिवस रंगला आणि माझी सर्व भजी आणि फरसाण विकला गेल्याबद्दल त्या पारशी बाईने मला दोन प्लेट कांदा भजी देत माझे मनापासून आभार मानले.

Comments are closed.