Thackeray group sent notice to Minister Nitesh Rane through Asim Sarode
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त भाषणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर ते ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी जाऊन कोणतेही वादग्रस्त विधान करण्यात येऊ नये, असे त्यांना सांगितले जाते. परंतु, तरी सुद्धा ते वादग्रस्त विधान आणि भाषणे करून वादाला तोंड फोडतातच. त्याचमुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मंत्री नितेश राणे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी मंत्री राणेंना नोटीस पाठवली आहे. मंत्रीपदाची शपथ संविधानाच्या कलम 164(3) नुसार घेताना ज्या संविधानिक कर्तव्याचे पालन करावे, पण ती संविधानिक जबाबदारी नितेश राणे पाळत नाहीत असा आरोप माजी खासदार विनायक राऊतांनी केला आहे. (Thackeray group sent notice to Minister Nitesh Rane through Asim Sarode)
मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री असलेल्या नितेश राणे यांनी 15 फेब्रुवारी रोजी कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे भारतीय जनता पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी म्हटले होते की, येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुम्हाला विश्वास देतो की जिल्हा नियोजनाचा सरकारकडून मिळणारा निधी असेल तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल, बाकी कोणालाही भेटणार नाही. जिथे जिथे उबाठा आणि महाविकास आघाडीचे सरपंच किंवा पदाधिकारी असतील त्या गावांमध्ये एक रुपयाचा निधी देणार नाही हे तुम्हाला आधीच सांगतो. कोणाला गावाचा विकास करायचा असेल तर महायुती मध्ये प्रवेश करून जा… तरच काम होतील नाहीतर विकास होणार नाही, असा इशाराच राणेंनी दिला होता.
परंतु, मंत्रिपदावरील व्यक्तीने असे भेदभाव व विषमता पसरविणारे, द्वेषपूर्ण विधान करणे घटनाबाह्य आहे, तसेच संविधानाचा आणि लोकांचा अपमान असल्याने ही नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती विनायक राऊत यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी दिली. कोणाहीबद्दल आकस, द्वेषभावना न ठेवता तसेच कुणाबद्दलही विशेष प्रेम न दाखवता, सगळ्या नागरिकांसाठी काम करण्यास बांधील राहील, अशी शपथ मंत्री म्हणून नितेश राणे यांनी घेतलेली आहे, त्या संविधानिक शपथेचा त्यांना विसर पडला का? असा प्रश्न माजी खासदार विनायक राऊत यांनी नोटीस द्वारे उपस्थित केला आहे.
नितेश राणे हे चुकीच्या प्रशासनाच्या दिशेने लोकशाहीला नेत आहेत आणि चुकीचा पायंडा महाराष्ट्राच्या राजकरणात निर्माण करीत आहेत. म्हणून कायदेशीर नोटिस पाठवीत असल्याचे माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटले. यापूर्वीही नितेश राणे यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी असेच वक्तव्य सरपंचांच्या मेळाव्यात केले होते. ‘जे भारतीय जनता पक्षाचे नाहीत, जे भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांना मत देणार नाहीत, ज्या गावातून नारायण राणे यांना लीड मिळणार नाही, त्या गावांना कोणताही विकास निधी मिळणार नाही’ अशी जाहीर धमकीही तेव्हा देण्यात आली होती, असे नोटीसीच्या माध्यमातून विनायक राऊतांनी सांगितले.
राज्यपालांनी राज्यघटनेच्या कलम 164(3) नुसार दिलेल्या दिलेल्या मंत्रिपदाच्या शपथेचे नितेश राणे उल्लंघन करत असल्याने ते संविधान विरोधी वागत आहेत. त्यामुळे भाजपा सदस्य व भाजपाला मतदान करणारे तसेच इतर पक्षांचे असा भेदभाव करून भाजपा विरोधी असतील त्यांना व महाविकासाघाडीच्या सदस्यांना विकासासाठी निधी देणार नाही, अशी धमकी देऊन भेदभाव व विषमता निर्माण करणार्या नितेश राणे यांना मंत्री पदावर कायम न ठेवण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्यपालांना विनंती करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता मंत्री राणे या नोटीसीला काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.