Thackeray targets BJP while opposing compulsion of Hindi


पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या शालेय शिक्षणातून हिंदीला दूर केले, पण मुंबई-महाराष्ट्रावर ‘लोंढे’ आदळून मराठी भाषा आणि संस्कृतीचे उच्चाटन व्हावे म्हणून शालेय शिक्षणात हिंदी सक्तीची केली.

(Thackeray about Hindi) मुंबई : हिंदी भाषिक राज्यांचे राजकारणात वर्चस्व आहे म्हणून त्यांनी हे वर्चस्व इतरांवर का गाजवावे? लखनऊ, वाराणसी, जयपूर, भोपाळपेक्षा हिंदी साहित्य, कला, संस्कृतीची जोपासना मुंबईतच झाली. हिंदी सिनेमे, हिंदी संगीत, हिंदी कलावंतांचे माहेरघर मुंबईत आहे. त्यामुळे येथे हिंदीचे प्रचलन आहे, पण हे प्रचलन मराठी भाषेच्या मुळावर येत असेल तर मराठी माणसे एखाद्याच्या कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा खाडकन उमटवायला मागेपुढे पाहत नाहीत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (Thackeray targets BJP while opposing compulsion of Hindi)

केंद्राने जे काही ‘त्रिभाषा’ सूत्र आणले ते एक त्रांगडे आहे आणि राज्याराज्यांच्या भाषांच्या गळ्यातले लोढणे बनले आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या गुजरात प्रांतात हिंदी भाषेची सक्ती केली नाही. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या शालेय शिक्षणातून हिंदीला दूर केले, पण मुंबई-महाराष्ट्रावर ‘लोंढे’ आदळून मराठी भाषा आणि संस्कृतीचे उच्चाटन व्हावे म्हणून शालेय शिक्षणात हिंदी सक्तीची केली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

हिंदी ही देशाची संवाद भाषा आहे, पण हिंदीला राजभाषा किंवा राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळालेली नाही. भारतीय संविधानात तसा संदर्भ नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले आहे की, ‘‘भाषेच्या आधारावर लोकांना विभागणे योग्य नाही. हिंदीला राष्ट्रभाषा बनवल्यास इतर भाषिक समुदायांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि त्यामुळे देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होईल.’’ कोणतीही भाषा कोणावरही लादता येणार नाही हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणायचे होते, असे ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

अमेरिकेत हिंदी सक्तीची करण्याची गरज नाही

मुळात मुंबई किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यात शालेय शिक्षणात हिंदी सक्तीची करण्याची गरज नाही. ज्या देशाचे पंतप्रधान बिहारच्या जाहीर सभेत इंग्रजी भाषण करतात आणि कॅनडा, सायप्रस, क्रोशियासारख्या देशांत जाऊन तेथील राष्ट्रप्रमुखांशी हिंदीत तारे तोडतात, अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही हिंदीत बोलतात, त्या देशात हिंदी सक्तीची करण्याची गरज नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.



Source link

Comments are closed.