Thackeray warns of caution regarding Hindu-Muslim dispute
(Uddhav Thackeray) मुंबई : काश्मिरात सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आणि अश्रूंचा बदला घ्या, पाकिस्तानला अद्दल घडवा, असा जनआक्रोश आहे. पहलगाम हल्ला अमानुष, निर्घृण आहे आणि त्याचा बदला घ्यावाच लागेल, पण बदला घेणे म्हणजे काय? निवडणुकीत भाजपाला मतदान करा, मोदी यांनाच पंतप्रधान करा आणि तसे केल्यानेच ‘बदला’ पूर्ण होईल, पाकडे बिळात लपतील, असे ज्यांना वाटते त्या सगळ्यांपासून देशाला खरा धोका आहे, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. (Thackeray warns of caution regarding Hindu-Muslim dispute)
बदला पाकिस्तानचा आणि दहशतवाद्यांचा घ्यायचा आहे. देशातील मुसलमानांना आव्हान देऊन, त्यांच्या मशिदी-मदरशांवर हल्ले करून पहलगामचा बदला पुरा होईल काय? काही लोकांना तसे करण्याची खुमखुमी जडली आहे. लढाई पाकिस्तानविरोधात आहे, भारतीय नागरिक असलेल्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांविरोधात नाही, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे.
हेही वाचा – Pahalgam Terror Attack : सरकारी दाव्याचा फुगा फुटल्याने…, उद्धव ठाकरेंचे मोदी सरकरावर टीकास्त्र
पहलगामचा हल्ला अमानुष आहे, पण या प्रकरणात हिंदू-मुसलमान संघर्षाची काडी लावणे हे त्यापेक्षा अमानुष आहे. पहलगाम येथील गावकऱ्यांनी जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत सुरू केली. सईद हुसैन शाह या स्थानिक तरुणाने दहशतवाद्यांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने अतिरेक्याच्या हातातून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. ‘हे लोक आपले पाहुणे आहेत, त्यांना मारू नका,’ अशी विनवणी सईद करीत होता. अखेर त्यालाही प्राण गमवावे लागले. सईद हिंदू नव्हता तरीही त्याला अतिरेक्यांनी मारले, असे त्यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात नमूद केले आहे.
पहलगाम तसेच आजूबाजूस अडकलेल्या पर्यटकांना स्थानिकांनी मदत केली, असे सर्व पर्यटक सांगत असताना भाजपाचा ‘आयटी’ सेल या घटनेतही हिंदू-मुसलमानांचा चुना लावतो हे धक्कादायक आहे. पहलगाममधील हल्ला हा फक्त पर्यटकांवर झालेला नसून आमच्यावर झाला. आम्ही त्यात घायाळ झाल्याची मानवी भावना काश्मिरी जनतेने व्यक्त केली, याची दखल घ्यावी लागेल, असेही अग्रलेखात नमूद केले आहे.
आपली लढाई पाकिस्तानशी आणि दहशतवादी टोळ्यांशी आहे. या लढाईत कोणी भारतीय मुसलमान आणि काश्मिरी जनतेला बदनाम करणार असतील तर देशातील समस्या त्यांना सोडवायच्या नाहीत आणि पुलवामाप्रमाणे पहलगामचेही राजकारण करायचे आहे, असेच मानावे लागेल. सरकारने आता फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करावा. हिंदू-मुसलमान आपसांत काय ते बघून घेतील, असेही ठाकरे यांनी सुनावले आहे.
हेही वाचा – Pahalgam Terror Attack : सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरूच, सुषमा अंधारेंचा शिंदेंवर निशाणा
Comments are closed.