भरकटलेल्या तरुणाची केली सुखरूप घरवापसी, सिक्युर कंपनीच्या स्टाफची कौतुकास्पद कामगिरी

कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्येमुळे 30 वर्षांचा तरुण घरातून बाहेर पडला. विशाखापट्टणणहून गोवा मग तेथून तो मुंबईत आला. दुर्दैवाने मुंबईत त्यांचे सर्व सामान चोरीला गेले. तीन महिने तो असाच भटकत होता. सिक्युर वन कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तो नजरेस पडला आणि त्याची सुखरूप घरवापसी झाली.

थागरमपुडी यशवंत (30) असे त्या तरुणाचे नाव आहे.  तो गेल्या चार दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात भटकत होता. केस, दाढी वाढलेली, अस्वच्छ कपडे अशा अवस्थेत तो होता. बुधवारी तो विमानतळाजवळ येताच तेथे तैनात असलेले सिक्युर वन कंपनीचे अधिकारी सागर राहिदुने यांच्या तो नजरेस पडला. सागर यांनी माणुसकी दाखवत यशवंतशी संवाद साधला आणि त्याला बोलते केले. तेव्हा विशाखापट्टणम येथील राहणारा असून कौटुंबिक समस्येतून आलेल्या नैराश्याने घरातून बाहेर पडलो. आधी गोव्याला गेलो. मग मुंबईला आलो, पण इथे आल्यावर माझे सामान चोरीला गेले. त्यात कपडे, पैसे,  तिकीट आदी होते. त्यानंतर असाच भटकत असल्याचे त्याने सांगितले. जवळपास तीन महिन्यांपासून मुंबईत असून मिळेल ते खाऊन कुठेही आसरा घेत होतो, असेही तो म्हणाला. यशवंतची समस्या लक्षात येताच सागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशवंतने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो नंबर यशवंतच्या वडिलांचा निघाला. त्यांनी यशवंत त्यांचाच मुलगा असून तीन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी यशवंतला विशाखापट्टणमला पाठविण्यासाठी पैसे पाठवले.

विमानाने घरी पाठवले

सागर व सिक्युर वनच्या अन्य कर्मचाऱ्यांनी यशवंतला कपडे दिले. त्याचे केस, दाढी केली. त्याला खाऊपिऊ घातले. मग विमानाचे तिकीट काढून त्याला पाठवून दिले. आज दुपारी यशवंत त्याच्या विशाखापट्टणम येथील घरी सुखरूप पोहोचला. सिक्युर वनच्या स्टाफने दाखवलेल्या माणुसकीबाबत त्यांचे कौतुक होत आहे.

Comments are closed.