थायलंड आणि कंबोडियामध्ये तात्काळ युद्धबंदीवर सहमती; 4 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम

थायलंड आणि कंबोडियामध्ये गेल्या 4 दिवसांपासून सीमा संघर्षावरून युद्ध भडकले होते. आता थायलंड आणि कंबोडिया यांनी ‘तात्काळ आणि बिनशर्त’ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी सोमवारी सांगितले की, अनेक दिवसांपासून सुरू असलेला सीमा संघर्ष संपवण्यासाठी थायलंड आणि कंबोडिया तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीवर सहमत झाले आहेत. थायलंड-कंबोडिया संघर्षात मध्यस्थी करण्याची ऑफर मलेशियाने दिल्यानंतर ही युद्धबंदी करण्यात आली आहे.
कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट आणि थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई मलेशियातील पुत्रजया येथील इब्राहिम यांच्या निवासस्थानी मध्यस्थी चर्चेला उपस्थित होते. त्यांच्यासोबत मलेशियातील चीन आणि अमेरिकेचे राजदूत होते. दोन्ही देशांमधील संघर्ष 24 जुलै रोजी सुरू झाला होता. 24 जुलै रोजी थायलंडने कंबोडियातील अनेक लक्ष्यांवर बॉम्बहल्ला करण्यासाठी एफ-16 लढाऊ विमान पाठवले. दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात सुमारे 11 नागरिकांचा मृत्यू झाला. सीमेवरील तणाव युद्धात रूपांतरित झाला. दोन्ही देशांनी त्यांच्या 817 किमी लांबीच्या भू-सीमेवर जोरदार तोफ आणि बॉम्बहल्ले करण्यात आले आणि तणावात आणखी भर पडली.
दोन्ही बाजूंनी एकमेकांवर संघर्ष सुरू केल्याचा आरोप केला. या संघर्षात 35 जण ठार झाले असून 2,60,000 हून अधिक लोक विस्थापित झाले. दोन्ही देशांनी त्यांचे राजदूत परत बोलावले आणि थायलंडने कंबोडियासोबतच्या सर्व सीमा बंद केल्या. कंबोडियाने नागरी लक्ष्यांवर गोळीबार केल्याच्या थायलंडच्या आरोपांचे जोरदार खंडन केले आहे आणि म्हटले आहे की थायलंडने निष्पाप लोकांचे जीव धोक्यात घातले आहेत. थायलंडने आपल्याविरुद्ध केलेल्या आक्रमकतेचा निषेध करण्याचे आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे.
थायलंड आणि कंबोडियामध्ये त्यांच्या 817 किमी लांबीच्या भू-सीमेवर अनेक दशकांपासून वाद सुरू आहे, ज्यामध्ये प्राचीन हिंदू मंदिर ता मोन थॉम आणि 11 व्या शतकातील प्रीह विहारची मालकी हा मुख्य वाद आहे. 1962 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने प्रीह विहार कंबोडियाला बहाल केला होता, परंतु 2008 मध्ये कंबोडियाने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध करण्याचा प्रयत्न केल्यावर तणाव वाढला आणि अनेक वर्षे चाललेल्या संघर्षात सुमारे एक डझन लोक मृत्युमुखी पडले. जूनमध्ये कंबोडियाने सांगितले की त्यांनी थायलंडसोबतचे त्यांचे वाद जागतिक न्यायालयाला सोडवण्याची विनंती केली होती, तर थायलंडने म्हटले आहे की त्यांनी कधीही न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राला मान्यता दिली नाही आणि द्विपक्षीय दृष्टिकोन पसंत केला. आता दोन्ही देश युद्धबंदीसाठी सहमत झाल्याने या युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे.
Comments are closed.