ठाण्यात कमी वजनाच्या ६७० बालकांना मिळाले नवे जीवन, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर ठरले देवदूत
>>श्रितिका शेलार-जाधव
ठाण्यात कमी वजनाच्या ६७० बालकांना नवे जीवन मिळाले आहे. या बालकांचे वजन अगदीच कमी असल्याने त्यांच्या जीवाला धोका होता. मात्र जिल्हा रुग्णालयातील बाल कक्षातील डॉक्टरांची टीम या नवजात बालकांसाठी देवदूत बनून धावून आली. वर्षभर त्यांनी केलेल्या योग्य उपचारामुळे या बालकांची प्रकृती सुधारली आहे. Meropenem, Piptaz, Amikacin, Caffein, Surfactant यासह अन्य औषधे या बालकांना देण्यात आल्याने त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या वर्षभरात एकूण ३ हजार २८ मुले जन्माला आली. यामध्ये १ हजार ५९१ मुले तर १ हजार ४४७ मुली जन्माला आल्या. यापैकी ६७० मुले ही कमी वजनाची जन्माला आली होती. ० ते १ किलो ग्रॅमची ३७, १ ते १.५ किलो ग्रॅमची ७० तर १.५ ते २.५ ग्रॅमच्या ५६३ मुलांचा अशा एकूण ६७० बालकांवर वर्षभरात डॉक्टरांनी नवजात बालक कक्षात उपचार केले. वजन कमी असलेल्या बालकांचे वजन वाढणे आवश्यक असते. अन्यथा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा बालकांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. जिल्हा रुग्णालयाचे डॉ. राहुल गुरव, डॉ. बोरुलकर, डॉ. वानखेडे, डॉ. शैलेश, डॉ. शाहापूर, तसेच परिचारिका शीतल जठार, अस्मिता कदम, मानसी पाटील, अपर्णा शेडके, कल्पना जाधव, हेमांगिनी जाधव, चित्रा गायकवाड, पुष्पा मालगे, अनिता कुवरा, प्रियांका वैरागे, प्रदीप कुवरा, प्रदीप गावित, प्राची मुळे आदींनी केलेल्या यशस्वी उपचारामुळे ६७० बालकांना संजीवनी मिळाली.
G जिल्हा रुग्णालयात विशेष नवजात अर्भक काळजी कक्ष कार्यान्वित आहे. या कक्षामध्ये ग्रामीण भागातील नवजात अर्भकांना उच्च दर्जाच्या उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. येथे नवजात बालकांसाठी आवश्यक उपकरणे व सेवा सतत पुरविली जात आहे. बालकांमध्ये होणारे गंभीर आजार जसे की अकाली जन्म, कमी वजन, कावीळ, जन्मतः श्वसनाचा त्रास किंवा इतर जन्मजात विकार यांचे प्रभावी उपचार येथे केले जातात. – कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय
Comments are closed.