धक्कादायक! इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर ब्लॅकमेलिंग अन् शेवटी व्हिडिओ कॉल करुन तरुणीने संपवले जीव

मुंबई गुन्हा: कल्याण तालुक्यात  वेगवेगळ्या धक्कादायक घटनांमुळे परिसरात चांगलीच  खळबळ उडाली आहे. इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर ब्लॅकमेलिंग, शेवटी व्हिडिओ कॉल करुन तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. टिटवाळ्यात प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केलीय. या नराधमाने अनेक तरुणीशी प्रेम संबंध प्रस्थापित करून लुटल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे डोंबिवलीत तरुणीला प्रमाचा जाळ्यात ओढून अश्लील व्हिडीओ व्हायरल कारेन अशी धमकी दिले घाबरून तरुणीने स्नॅपचॅट वर विडिओ पाठवताच आरोपीने तो व्हिडिओ  व्हायरल केला.

नेमके प्रकरण काय?

कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली ओळख, त्यानंतरचे प्रेमसंबंध आणि ब्लॅकमेलिंग यामुळे अखेर एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपी ऋतिक रोहने याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्री झाल्यानंतर ती प्रेमात बदलली. या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याकडून दागिने घेतले. एवढेच नाही, तर तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तो सतत तिला त्रास देत होता. या मानसिक दबावाला कंटाळून पीडित तरुणीने थेट व्हिडिओ कॉलदरम्यान गळफास घेऊन जीवन संपवले.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, आरोपी ऋतिक रोहनेने केवळ या तरुणीला नव्हे तर इतर काही मुलींनाही अशाच प्रकारे फसवल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे.कल्याण ग्रामीण आणि टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्लील फोटो केले व्हायरल

सोशल मीडियावरून तरुणींना जाळ्यात ओढण्याची आणि त्यांचा गैरफायदा घेण्याची आणखी एक धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीला इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून आरोपी चिराग गावंडे याने जाळ्यात ओढले.मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही ओळख मैत्रीतून झाली आणि नंतर ती प्रेमसंबंधात रूपांतरित झाली. त्यानंतर आरोपीने तरुणीचे अश्लील फोटो काढले. एवढ्यावर न थांबता त्याने तिच्याकडून वारंवार अश्लील व्हिडिओची मागणी केली. व्हिडिओ न दिल्यास इंस्टाग्राम व स्नॅपचॅटवर फोटो व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली. धमकीला घाबरून अल्पवयीन तरुणीने काही व्हिडिओ आरोपीकडे पाठवले. मात्र आरोपीने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.या प्रकारानंतर कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला. मुलीचे अश्लील फोटो व व्हिडिओ आई-वडिलांच्या मोबाईलवर पोहोचल्याने घरच्यांनी धाव घेत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे डोंबिवलीत खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. स्थानिकांच्या मते, अल्पवयीन मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण आणि सतत लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
पोलीस प्रशासनाकडून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत असून तरुणींनी अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर संवाद साधताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.