Thane crime news – मदनपुरातून 7 किलो ड्रग्ज जप्त,10 जणांच्या टोळीला अटक

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाने ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत आगरीपाडा पोलीस ठाणे हद्दीतील मदनपुरातून १३ कोटींचे ७ किलो एमडी जप्त केले. ड्रग्ज रॅकेट्सची पाळेमुळे खोदून काढत पोलिसांनी मुंबई, मीरा रोड आणि गुजरातमधील १० जणांच्या टोळीला अटक केली.

मीरा रोड येथील नयानगर भागातील छेडा आदर्श बिल्डिंगमध्ये पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी छापा टाकला होता. यावेळी आरोपी फिरदोस कुरेशी या महिलेच्या घरातून १ किलो एमडी जप्त केले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने अधिक तपास केला असता हे जाळे केवळ मीरा रोड पुरते मर्यादित नसून मुंबई आणि गुजरातपर्यंत पसरल्याचे समोर आले.

पोलिसांनी तपास करत या साखळीतील फिरदोस कुरेशी, अरबाज कुरेशी, मोहम्मद शेख (मीरा रोड), मोईज खान, आकाश यादव (जोगेश्वरी), अरमान अली, सुनील यादव (ओशिवरा), इरफान कुडीया (राजकोट), मोहम्मद अन्सारी (भायखळा), खालदा अन्सारी (मदनपुरा) यांना अटक केली. पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे व दत्तात्रय सरक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

भिवंडीत हातभट्टीवर धाड

भिवंडी तालुक्यातील कालवार गावाजवळील खाडी परिसरात धाड टाकत पोलिसांनी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनेही कारवाई करत २ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हातभट्टी लावणारा सुभाष पंडित फरार झाला. ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी जिल्ह्यात गावठी हातभट्टी दारू तयार करणारे आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पैशांसाठी पत्नीला मारहाण

डोंबिवलीजवळील ग्रामीण भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेला पतीकडून पैशांसाठी सतत छळ सहन करावा लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेश्याव्यवसाय करून पैसे आण, असा दबाव टाकत नराधम पती पत्नीला अमानुष मारहाण करत होता. याप्रकरणी पीडित विवाहितेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यश गुप्ता असे आरोपीचे नाव असून दागिने घेऊन तो फरार झाला आहे.

Comments are closed.