ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2026

ज्ञानशक्ती युवा संघर्ष मंडळ, संकल्प क्रीडा यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात तिसरी फेरी गाठली. दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलमध्ये हे सामने झाले. होतकरू मंडळ – अ संघाने उपउपांत्य फेरीत धडक दिली. कळवा, खारेगाव येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात सुरु असलेल्या महिलांच्या दुसऱ्या फेरीत ज्ञानशक्ती युवाने जयशिव अकादमीचा ३३-२२ असा पराभव केला.
ब्रेकनंतर १८-१० अशी आघाडी घेणाऱ्या ज्ञानशक्तीने दोन्ही डावात १-१ लोण देत आपला विजय सोपा केला. धानी राणे, हिमाली गायकवाड ज्ञानशक्तीकडून तर कल्याणी डोंगरे, गायत्री काटे जयशिव संघाकडून चतुरस्त्र खेळले. संघर्ष क्रीडाने स्फूर्ती सेवाला ३५-३३ असे चकवीत तिसरी फेरी गाठली. तृप्ती देवकाते, प्रतिक्षा मरकड यांनी आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात २ लोण देत संघर्षला २७-१२ अशी मोठी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात सावध खेळ करण्याच्या नादात सामना संघर्षच्या हातून निसटणार होता. तृप्तीच्या दीपाली पागाडे, स्मिता शिंदे यांनी टॉप गिअर टाकत संघर्ष वर लोण देत आघाडी कमी पडली. पण संघाला विजयी करण्यात त्या कमी पडल्या.
संकल्पनने वनिता मंचेकर, मेघना खेडेकर, गौरी भोसले यांच्या चढाई पकडीच्या खेळाने न्यू साई श्रद्धा संघाला २३-१८ असे पराभूत केले. विश्रांतीला दोन्ही संघ ९-९ असे बरोबरीत होते. स्नेहा हटाले, मयुरी काळे यांनी न्यू साई श्रद्धा कडून कडवी झुंज दिली. रात्री उशीरा झालेल्या सामन्यात होतकरू मंडळ – अ संघाने माऊली स्पोर्टस् ला ४४-२३ असे नमवीत उपउपांत्य फेरी गाठली.
पहिला लोण देत सावध खेळ करीत होतकरूने मध्यंतराला १९-१० अशी आघाडी घेतली. नंतर आपला खेळ अधिक गतीमान करीत आणखी २लोण देत. आपला विजय साकारला. वेदिका वावेकर, प्राजक्ता पुजारी, ऐश्वर्या राऊत होतकरू कडून उत्कृष्ट खेळल्या. नीलम वराडकरने माऊली संघाकडून एकाकी लढत दिली.
पुरुषांत ओम वर्तकनगरने विवेकस्मृतीला ३५-०७ने, श्री समर्थने अरुण मंडळाला ३२-२४ने तर जय खामदेश्वरने साई कृष्णाला २५-०४ असे पराभूत करीत तिसरी फेरी गाठली.
Comments are closed.