ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी: ग्रीफिन्स जिमखाना, श्री स्वामी समर्थ कुमार गटाच्या अंतिम फेरीत

ग्रीफिन्स जिमखाना आणि श्री स्वामी समर्थ यांनी कुमार गटात ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. पुरुषांत मोरया मंडळ चौथ्या फेरीत दाखल. खारेगाव येथील सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात सुरु असलेल्या कुमार गटाच्या उपांत्य सामन्यात ग्रीफिन्स जिमखाना संघाने ओम कबड्डी संघाचा प्रतिकार २६-१४ असा मोडून काढत अंतिम फेरी गाठली.
आदित्य पिलाणे, तन्मय पवार यांनी सुरवातीला आक्रमक खेळ करीत लोण देत पूर्वार्धात १५-०४ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत आपला विजय साकारला. ओम कबड्डीच्या यतेश भोपी आणि सिद्धेश साळुंखे यांनी उत्तरार्धात आपला खेळ गतीमान करीत ही आघाडी कमी करण्याचा उत्तम प्रयत्न केला, मात्र संघाला विजयी करण्यात ते अपयशी ठरले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्री स्वामी समर्थ मंडळाने डॉन बॉस्को स्पोर्ट्सला चुरशीच्या लढतीत ४२-४० असे चकवीत अंतिम फेरीत धडक दिली. पहिल्या डावात २ लोण देत स्वामी समर्थने २६-२० अशी आघाडी घेतली. एका लोणची परतफेड करीत डॉन बॉस्कोने ही आघाडी सीमित ठेवली. दुसऱ्या डावात सामना आणखी रंगदार अवस्थेत गेला. या डावात दोन्ही संघानी एका-एका लोणची नोंद केली. त्या डावात स्वामी समर्थने १६, तर डॉन बॉस्कोने २० गुणांची कमाई केली. पण पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर स्वामी समर्थने २ गुणांनी बाजी मारली. विवेक शिंदे, विशाल सिंग, विवेक चोरगे श्री स्वामी समर्थ कडून, तर जीत सैनी, सूरज वायकर आणि ध्रुव लोखंडे डॉन बॉस्कोकडून उत्कृष्ट खेळले.
पुरुष प्रथम श्रेणीच्या तिसऱ्या फेरीत मोरया मंडळाने होतकरू मित्र मंडळावर २३-१४ अशी मात केली. विश्रांतीला ८-९ अशा पिछाडीवर पडलेल्या मोरयाने विश्रांतीनंतर टॉप गिअर टाकत लोण देत ९ गुणांनी सामना आपल्या बाजूने झुकवीला. परेश हरड, धीरज तरे यांच्या झंझावाती त्यांना मोहित भरवाढ याची मिळालेली पकडीची सुंदर साथ यामुळे मोरयाने हा विजय साकारला. होतकरूचा देवेन पाटील चमकला. या अगोदर झालेल्या पुरुषांच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात ग्रीफिन्स जिम. ने स्व. रतन पाटील संघाला ४५-१२ असे अष्टविनायकने नंदकुमार क्रीडाला ३०-१० असे, डॉन बॉस्कोने भाऊ स्पोर्टस् ला ३२-२८ असे श्री गणेश मंडळाने उत्कर्ष संघाला ३५-२५ असे, तर चिंतामणी स्पोर्टस् ने वेताळ मंडळाला ३८-२१ असे पराभूत करीत तिसरी फेरी गाठली.
Comments are closed.