ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा: उजाळा मंडळ, श्री समर्थसह आणखी दोन संघ चौथ्या फेरीत दाखल

उजाळा मंडळ, जय बजरंग-खारेगाव, जॉयकुमार आणि श्री समर्थ यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन ने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धेची चौथी फेरी गाठली आहे. श्री विठ्ठल मंडळाने ५-५ चढायाच्या डावात विजयी होत चौथ्या फेरीत धडक दिली. कळवा, खारेगाव येथील सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात सुरु असलेल्या प्रथम श्रेणी पुरुषांत श्री विठ्ठल मंडळाने चुरशीच्या लढतीत डॉन बॉस्को स्पोर्टस्चे आव्हान ५-५ चढायाच्या जादा डावात ३७-३४(७-४) असे संपवीत ऐटीत चौथी फेरी गाठली.

विश्रांतीला १३-१५ असे २ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या श्री विठ्ठल मंडळाने पूर्ण डावात ३०-३० अशी बरोबरी साधली. नंतर ५-५ चढायात योगेश जाधवने आपल्या चढाईत २ गडी टिपत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली. त्याला चढाईत चिन्मय गुरव, अक्षय मकवाना यांची, तर पकडीत चेतन मलिक, अक्षय गुरव यांची उत्तम साथ लाभली. डॉन बॉस्कोच्या आकाश गुप्ता, जीत सिंग, विनायक सवारे यांनी पूर्ण डावात उत्कृष्ट खेळ केला, मात्र जादा डावात त्यांचा प्रभाव पडला नाही.

उजाळा मंडळाने पूर्वार्धातील १२-१८ अशा पिछडीवरून नव तरुण मंडळाचा प्रतिकार ४३-३१ असा मोडून काढला. मिहीर पाटील आणि सुमित पाटील यांच्या झंझावाती चढायांना यश भोईर आणि अक्षय भोईर यांची मिळालेली भक्कम बचावाची साथ त्यामुळे हे शक्य झाले. नव तरुणाच्या मानिक राठोड, नितीन राठोड, चंदन चव्हाण यांच्या खेळ दुसऱ्या डावात ढेपळला.

जय बजरंग खारेगांव संघाने आर्यन पाटील आणि सोहम मोरे यांच्या चढाई पकडीच्या उत्कृष्ट खेळामुळे श्री समर्थ मंडळाला २६-२२ असे नमविले. श्री समर्थच्या विवेक शिंदे आणि राहुल पाटील यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी लढत दिली. जॉय कुमार स्पोर्टस्ने श्री मावळी मंडळाला २३-२२ असे चकवीत चौथी फेरी गाठली. पियुष तिवारी, जितेश चौधरी जॉय कुमार कडून, तर अभिजित घारे, स्वरूप साळुंखे मावळी मंडळाडून उत्कृष्ट खेळले.
श्री समर्थने स्व. रतन पाटील संघाला ३०-२६ असे नमविले. सुजल म्हात्रे, उमेश म्हात्रे या विजयाचे शिल्पकार ठरले. स्व. रतन पाटील संघाचे सुनील देवकर, संदीप सपकाळ चमकले. आत्माराम मंडळाने स्व. आकाश मंडळाचा २६-२१ असा पराभव केला. विजयी संघाचा अभिजित भोईर तर पराभूत संघाच्या विशाल पाटीलने चमकदार खेळ केला.

इतर निकाल संक्षिप्त :- 1) विजय मंडळ विद्यालय, श्री हनुमान (37-30), 2) ओम वर्तकनगर विद्यालय, जय खामडेश्वर (39-30), 3) जय बजरंग, वाशिंद विद्यालय, नवरत्न (44-19), 4) शिवशंकर विद्यालय, ग्रिफिन्स जिम. ब (36-07).

Comments are closed.