एकनाथ शिंदेंना ठाण्यात धक्का, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिला धक्का बसला आहे. शिंदे गटात ठाण्यामध्ये प्रचंड नाराजी असून त्यातूनच जिल्हा संघटक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आज तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
बदललेल्या राजकीय परिस्थितीत मी काम करण्यास असमर्थ असल्याचे कारण देत मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे शिंदे गटात ठाण्यात सुरू असलेली खदखद समोर आली आहे.
ठाण्यातील प्रभाक क्र. 3 मध्ये संजय भोईर यांचे भाऊ भूषण भोईर हे गेल्यावेळी निवडून आले होते. भोईर कुटुंब वॉर्डाबाहेरचे असल्याने त्यांच्यापैकी कुणालाही यावेळी येथे उमेदवारी देऊ नका. स्थानिक उमेदवार द्या, अशी मागणी मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेल्या विक्रांत वायचळ यांनी केली होती. या मागणीमुळे त्यांची शिंदे गटातून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळेच मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात असून शिंदे गटात अनेक वॉर्डामध्ये अशी नाराजी असल्याचे चित्र आहे.
म्हस्के यांनी ताबा घेतला
ठाण्यात शिंदे गटाची सूत्रे खासदार नरेश म्हस्के यांनी ताब्यात घेतली आहेत. पालिकेचे तिकीटवाटप तेच करत आहेत. ते त्यांच्या समर्थकांना झुकते माप देत आहेत. त्यातून शिंदे गटात गटबाजी मोठय़ा प्रमाणात सुरू झाली आहे.
Comments are closed.