गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण
ठाणे कल्याण क्राईम न्यूज : कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात किरकोळ कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. गाडी हळू चालव असे सांगितल्याचा राग आल्याने पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबावर हल्ला करत घराची तोडफोड केली आहे. तसेच बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
टिटवाळा आंबेकर चौक परिसरातील आर. के. चाळ, राजेश्वरी बिल्डिंगजवळ ही घटना घडली. 50 वर्षीय तक्रारदार झुल्फेकर अली अब्दुल्ला खान वय हे आपल्या भावांसह फॅब्रिकेशनचे काम करतात. 3 मार्च रोजी ते आपल्या भावांसह घराबाहेर उभे असताना एका तरुणाने मोटारसायकल वेगात चालवत परिसरातून जात होता. त्यावेळी त्यांनी त्याला येथून गाडी हळू चालवा असे सांगितल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर संबंधित तरुण काही वेळातच आपल्या वडिलांसह आणि इतर साथीदारांना घेऊन घटनास्थळी परतला. त्यांनी शिवीगाळ करत लोखंडी वस्तूने घराची तोडफोड करत तक्रारदाराच्या डोक्यात मारहाण केली तसेच तोंडावर मारल्याने दोन दात पडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही आरोपींनी ठोशा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही आरोपींनी ठोशा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी पाच जणांविरोधात तक्रार देण्यात आली असून टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.