ठाण्याची मेट्रो डिसेंबरमध्ये धावणार, गायमुख-कासारवडवली-कॅडबरी जंक्शन; लाखो प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका
सणासुदीच्या काळात ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेली अनेक वर्षे नागरिक ज्या मेट्रोची वाट पहात होते ती आता डिसेंबरमध्ये धावणार आहे. गायमुख-कासारवडवली – कॅडबरी जंक्शन दरम्यान ही मेट्रो धावणार असून लाखो प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा मेट्रो मार्गिका क्रमांक ४ चा पहिला टप्पा आहे. डिसेंबर महिन्यात या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.
ठाणे मेट्रोचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. एमएमआरडीएच्या वतीने अनेक डेडलाईन दिल्या. पण प्रत्यक्षात मेट्रो सुरू झालीच नाही. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी डिसेंबरमध्ये मेट्रो-४च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती दिली. मेट्रो मार्गिका क्रमांक ४ आणि ४अ या मार्गांची एकूण लांबी ३५.२० किलोमीटर असून या प्रकल्पांतर्गत एकूण ३२ स्थानकांचे नियोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण मेट्रो मार्गिकेमुळे मुंबई, ठाणे तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि सार्वजनिक वाहतुकीचा आधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहे.
कोस्टल रोडचाही पर्याय
सध्या घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. मेट्रो सुरू झाल्यानंतर ही कोंडी काहीशी कमी होईल, असा दावा अधिकारी करीत आहेत. त्याशिवाय ठाणेकरांना कोस्टल रोडचाही पर्याय उपलब्ध होणार आहे. या कोस्टल रोडचे कामदेखील सध्या युद्धपातळीवर सुरू असून तो पूर्ण झाल्यानंतर आणखी एक पर्याय मिळणार आहे
प्रवासाचा वेळ वाचणार
गायमुख ते कॅडबरी जंक्शन या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर घोडबंदर परिसरातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल. प्रवासाचा वेळ वाचण्याबरोबरच इंधनाची बचत, प्रदूषणात घट होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे ठाण्यातील आर्थिक व व्यावसायिक केंद्रांशी संपर्क अधिक सुलभ होणार असून शहराच्या विकासालाही गती मिळणार आहे.
Comments are closed.