झाडांवर विद्युत रोषणाई करणाऱ्यांना ठाणे महापालिका देणार शॉक, विजेच्या केबल्स काढून थेट गुन्हे दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश
दिवाळीनिमित्त शहरातील झाडांवर विद्युत रोषणाई करणाऱ्यांना ठाणे महापालिका आता शॉक देणार आहे. झाडाच्या फांद्यांवर किंवा खोडावर विजेच्या केबल्स गुंडाळून रोषणाई केल्यास त्या केबल्स तत्काळ काढून संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. झाडांना इजा पोहोचवणे बेकायदेशीर असून झाडांचा वापर रोषणाईसाठी न करता पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ठाणे शहरामध्ये पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून झाडांवर बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या रोषणाईविरोधात ठाणे महापालिका प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. झाडांवर लपेटलेल्या विजेच्या केबल्समुळे झाडांच्या नैसर्गिक वाढीला अडथळा येतो. तसेच शॉर्टसर्किटमुळे झाडांमध्ये वीज उतरून मोठी दुर्घटना घडण्याचा आणि निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याचा धोका असतो. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान जोशी यांनी आज आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन या पुराव्यांसह तक्रार केली. त्यानुसार झाडांना खिळे ठोकून, तारा आणि विजेच्या केबल्स लपेटून विद्युत रोषणाई करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय संपूर्ण ठाणे शहरातील झाडांवरील सर्व प्रकारची रोषणाई आणि वायर तत्काळ हटवण्याचे आदेशही आयुक्तांनी यंत्रणेला दिले आहेत.
पालिकेची पथके विशेष मोहीम राबवणार
शहरातील हिरानंदानी इस्टेट आणि हिरानंदानी मेडोज परिसरात शेकडो झाडांवर रोषणाईच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर विद्युत केबल्स गुंडाळल्या गेल्या आहेत. तसेच झाडांच्या खोडांमध्ये लोखंडी खिळे ठोकण्यात आले आहेत. केवळ नोटीस देऊन न थांबता, थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आणि प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पालिकेची पथके शहरात विशेष मोहीम राबवून कारवाई करणार आहेत.
शहरातील झाडांवर लपेटलेल्या सर्व प्रकारच्या विद्युत माळा, केबल्स आणि ठोकलेले खिळे तत्काळ काढून जप्त करण्यात येणार आहेत.
झाडांचे नुकसान करणाऱ्या आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या सोसायट्या, व्यापारी संकुले किंवा संबंधितांवर वृक्ष संरक्षण कायद्यानुसार तत्काळ गुन्हे दाखल होणार आहेत.
झाडांचे नुकसान न करण्याबाबत शहरातील सर्व व्यावसायिक, दुकानदार आणि गृहनिर्माण सोसायट्यांना सक्त ताकीद देणाऱ्या जाहीर सूचना आणि परिपत्रके प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
Comments are closed.