ठाणे पालिकेला वाळवीने पोखरले; अनेक फाईल्स फस्त! टेंडर घोटाळा आणि 337 कोटींचा बेहिशेबी कारभार समोर येताच नवे ‘भूत’ उभे राहिले

<<< वसंत चव्हाण >>>

मिंध्यांनी हायजॅक केलेल्या ठाणे महापालिकेला टेंडर घोटाळा आणि 337 कोटींच्या बेहिशेबी कारभाराने ‘कुरतडले’ असतानाच आता पालिकेच्या मुख्यालयाला वाळवीने पोखरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वाळवीची लागण रोखण्यासाठी 2018 नंतर पालिकेने कोणतेही प्रयत्न न केल्याने मुख्यालयातील फर्निचरसह विविध विभागांतील महत्त्वाच्या फायलींचाही वाळवीने घास घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने साफसफाईसाठी तातडीने 18 लाख 93 हजार रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.

ठाणे महापालिकेत गेल्या 3 वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यातच पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असून वाळवी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशासनाकडे पैसे नसल्याने मुख्यालय इमारत परिसर व कार्यालयांमध्ये वाळवी, घुशी तसेच इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्रत्येक दोन वर्षानंतर कीटकनाशक मोहीम राबवली जाते. मात्र गेल्या वाळवी लागू नये म्हणून गेल्या आठ वर्षात प्रतिबंधात्मक उपाययोजनाच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुख्यालय इमारतीमधील अनेक विभागांमार्फत वाळवी रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सद्यस्थितीत फर्निचर, भिंती, छत आणि महत्त्वाच्या नस्तीना (फायलींना) वाळवीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वस्तू सडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान गेल्या काही वर्षात मिंधे गटाची सत्ता असलेल्या ठाणे पालिकेत 337 कोटींचा फुटलेला बेहिशेबी बॉम्ब तसेच टेंडर घोटाळ्यात काही बडे मासे अडकण्याची शक्यता असल्याने हे वाळवीचे भूत उठवून काही महत्त्वाच्या फाईल्स गायब करण्याचा डाव तर नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.

लेखापरीक्षणाचा हिशेब लागत नसल्याची चर्चा सुरू असतानाच टेंडर घोटाळ्यांनी बदनाम झालेल्या पालिकेचे बिंग फुटू नये म्हणूनच प्रशासनाने वाळवीचे ‘भूत’ उभे तर केले नाही ना, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

8 वर्षांपासून इमारतीकडे दुर्लक्ष

2017-18 या आर्थिक वर्षानंतर संपूर्ण मुख्यालय इमारतीमध्ये वाळवी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच 2019-20 या वर्षामध्ये आर्थिक तरतूदच नसल्याने गेल्या 8 वर्षापासून मुख्यालय इमारतीला लागलेल्या वाळवीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता या कामाची तातडी व आवश्यकता लक्षात घेता प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे.

मुख्यालय इमारत प्रशासनाच्या कार्यक्षेत्राचे केंद्र

ठाणे महानगरपालिका मुख्यालय इमारतीमध्ये पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांची कार्यालये आहेत. त्याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अरविंद पेंडसे, नरेंद्र बल्लाळ व धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने मुख्यालयाच्या इमारतीमध्ये सभागृह आहेत. मुख्यालय इमारत ही ठाणे महापालिका प्रशानाच्या कार्यक्षेत्राचा केंद्रबिंदू आहे.

Comments are closed.