सहा हजार ठाणेकरांना पालिकेच्या जप्ती नोटिसा, २८६ जणांवर कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मालमत्ता थकवणाऱ्या करदात्यांविरोधात ठाणे महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकीदार करदात्यांविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून प्रशासनाने ६ हजार ५८० ठाणेकरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यातील २८६ मालमत्तांवर वॉरंट बजावून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच ७३ मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर १२६ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

ठाणे महानगरपालिकेने मालमत्ता कर आणि इतर करांची थकबाकी वसूल करण्यासाठी मोहीम राबवली आहे. महापालिकेने आर्थिक वर्षांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. नोटीस मिळालेल्या ६ हजार ५८० नागरिकांना ठरावीक मुदतीत थकीत रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत, कर न भरल्यास मालमत्ता लिलावात काढली जाऊ शकते, असा इशारादेखील प्रशासनाने दिला आहे. कायदेशीर कारवाई आणि जप्ती टाळण्यासाठी थकीत कर तातडीने जमा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वसुलीसाठी प्रभागनिहाय पथके
मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने ही कारवाई अधिक कडक करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ऑनलाइन सुविधा उपलब्ध
कर भरणे सुलभ व्हावे यासाठी पालिकेने ऑनलाइन भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. propertytax.thanecity. gov.in या संकेतस्थळासह गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम अँपच्या माध्यमातून कर भरता येणार आहे. थकीत मालमत्ता कराचा भरणा करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

Comments are closed.