विकला जाणारा मी महाराष्ट्र सैनिक नाही! निवडणुकीतून माघार घेण्यासाठी ठाण्यातील मनसे उमेदवाराला भाजपकडून पैशांची ऑफर

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सीमा महेश इंगळे यांचे पती महेश इंगळे यांनी सोशल मीडियावर गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी भाजप उमेदवाराने पैशांची ऑफर केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
महेश इंगळे यांनी म्हटले आहे की, त्यांच्या पत्नी सीमा महेश इंगळे या प्रभाग क्रमांक ११ (क), निशाणी रेल्वे इंजिन या चिन्हावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मनसेतर्फे ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवत आहेत. या प्रभागात भाजपचे उमेदवार असलेल्या व्यक्तीच्या दीराने महेश इंगळे यांना आमिष दाखवून पत्नीची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी फेसबुकवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर करत हा गंभीर आरोप केला आहे.

Comments are closed.