मीरा-भाईंदरकरांना खुशखबर! परिवहनच्या ताफ्यात 20 नव्या ई-बसेस
मीरा-भाईंदरकरांसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा योजने अंतर्गत परिवहन सेवेच्या ताफ्यात 100 नव्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल होणार असून पहिल्या टप्प्यातील 20 मिडी ई-बस शहरातील डेपोत दाखल झाल्या आहेत. आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून नागरिकांना गारेगार प्रवास करता येणार आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत महाराष्ट्रासाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्त्वावर एकूण 1,290 ई-बसचा पुरवठा आणि संचालन करण्यासाठी मे. जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मीरा-भाईंदर शहरासाठी 100 वातानुकूलित ई-बस मंजूर झाल्या आहेत. त्यामध्ये 40 मिडी आणि 60 मोठ्या आकाराच्या बसचा समावेश आहे. 40 मिडी बसपैकी पहिल्या 20 बस शहरात दाखल झाल्या आहेत. दाखल झालेल्या बस प्रवाशी सेवेत आणण्यासाठी ठेकेदाराकडून आरटीओ नोंदणी, चार्जिंग स्टेशनची उभारणी, चार्जर्स बसविणे आणि अनुभवी चालकांची भरती अशा प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहेत. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या ई-बस शहरातील विविध मार्गावर धावणार आहेत.
प्रवाशांना मिळणार दिलासा
महापालिकेकडे असलेल्या 57 ई-बसपैकी सर्व बस सुस्थितीत असून दररोज 54 बस प्रवाशी सेवेत धावत आहेत. दुसरीकडे ताफ्यातील 74 डिझेल बसपैकी केवळ 36 बस सुस्थितीत असून त्यातील 31 बस सध्या रस्त्यावर आहेत. उर्वरित 38 डिझेल बसची ठेकेदाराकडून योग्य देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. परिणामी उपलब्ध बसची संख्या कमी पडत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
शहराची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीवरील वाढता ताण लक्षात घेता, नव्या 20 वातानुकूलित ई-बस सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरणपूरक करण्यास आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Comments are closed.