किल्ले रायगड दर्शनाहून परतताना भीषण अपघात; पुनाडे घाटात टेम्पो ट्रॅव्हलर उलटून 5 शिवभक्त जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

किल्ले रायगडचे दर्शन घेऊन परतणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनाला पुनाडे घाटात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो ट्रॅव्हलर उलटली. या अपघातात 5 शिवभक्त जखमी झाले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथील 18 शिवभक्त टेम्पो ट्रॅव्हलरने रायगड दर्शनासाठी आले होते. सायंकाळी दर्शन आटोपून माणगाव मार्गे पुण्याकडे परतत असताना रायगड-माणगाव रस्त्यावरील पुनाडे घाटात एका धोकादायक वळणावर वाहनाचे ब्रेक अचानक फेल झाले. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्यावरच उलटला. या अपघातात पाच शिवभक्त जखमी झाले असून तिघांना गंभीर दुखापत झाली आहे.

गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना सोडण्यात आले.

Comments are closed.