उल्हासनगरमध्ये बेकायदा फटाके विक्री; व्यापाऱ्यावर गुन्हा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात विनापरवाना फटाके विक्री करून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या एका व्यापाऱ्यावर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरात फटाक्यांची दुकाने सजली असतानाच, काही व्यापारी कोणत्याही सुरक्षेच्या नियमांचे पालन नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे बेकायदा फटाके विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
कॅम्प क्रमांक 2 मधील नेहरू चौक परिसरात अमन टॉकीज रस्त्यावर असलेल्या ‘महाकाल ट्रेडर्स’ येथे जितू मलमानी हे सार्वजनिक रस्त्यावर कठडा लावून फटाके विक्री करत होते. यामुळे परिसरातील रहिवासी आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद प्रकाश कांबळे यांच्या तक्रारीवरून जितू मलमानी यांच्याविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
40 विक्रेत्यांना परवाने
दरम्यान, उल्हासनगर शहरात फटाके विक्रीसाठी 40 विक्रेत्यांना परवाने देण्यात आले असून पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून त्यांच्या दुकानांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरात 40 पेक्षा अधिक फटाक्यांची दुकाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी एकाच परवान्यावर एकापेक्षा जास्त दुकाने सुरू आहेत. गेल्या वर्षी पोलिसांनी रहिवासी भागातील फटाक्यांच्या गोदामावर छापा टाकून लाखो रुपयांचे फटाके जप्त केले होते.
Comments are closed.