छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती वॉर्डमधील 20 बेड वाढले, गर्भवतींची परवड थांबली; नातेवाईकांना मोठा दिलासा

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन तेथील खाटांची संख्या २० ने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे गर्भवतींची परवड थांबली असून त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात दररोज सुमारे २०० बाह्य रुग्ण येतात. तसेच प्रसूतीपश्चात कक्षात आता एकूण ७० खाटा उपलब्ध आहेत. उपरोक्त विभागात दररोज सरासरी १८ प्रसूती होतात. ऑक्टोबर २०२५ मध्ये दररोज २२ प्रसूती झाल्या. त्याचबरोबर बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात एकूण ९८ महिला दाखल होत्या. रुग्णालयात ठाणे महानगरपालिका क्षेत्र तसेच आजूबाजूच्या क्षेत्रातून तसेच ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण क्षेत्रातून महिला प्रसूतीसाठी येतात. त्यामुळे बहुतांश वेळा खाटा पूर्णपणे भरलेल्या असतात. यावर तोडगा काढण्यासंदर्भात आयुक्तांच्या दालनात आज बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट आणि रुग्णालय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर उपस्थित होते.

मुंब्य्रातील दोन रुग्णालयांना विस्तारित केंद्राचा दर्जा

मुंब्रा येथील प्रसूतीगृहाकडून येणाऱ्या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम. एम. व्हॅली प्रसूतीगृहास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारित केंद्राचा दर्जा देण्यात यावा. या दोन्ही ठिकाणी अद्ययावत प्रसूतीशास्त्र विभाग पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर सुरू करण्यात यावा अशा सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

Comments are closed.