विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळा पुसला; कल्याणच्या के.सी. गांधी शाळेचा उद्दामपणा

टिळा लावून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कपाळ कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने पुसण्याचा उद्दामपणा कल्याणच्या के. सी. गांधी शाळेत घडला आहे. विद्यार्थिनींच्या हातातील बांगड्यादेखील काढल्या जात असल्याचा आरोप पालकांनी केला असून या प्रकरणी महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा प्रशासनाला नोटीस बजावली आहे.
के.सी. गांधी शाळा ही कल्याणमधील नामवंत शैक्षणिक संस्था असून तेथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कपाळाला लावलेला टिळा तसेच विद्यार्थिनींच्या हातातील बांगड्या, कपाळावरील टिकली याला हरकत घेत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण विधानसभा संघटक रुपेश भोईर यांनी केला आहे. आपल्या स्वतःच्या मुलाबाबतीतही असा प्रकार घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलांनी हातात राखी बांधली तरी त्यांना मारहाण केली जाते. तसेच यापुढे टिळा लावल्यास शिक्षा करण्याची धमकीदेखील मिळते, असे त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
सामंजस्याने वाद मिटवू
के.सी. गांधी शाळेतील मनमानीविरोधात रुपेश भोईर यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तसेच शाळेच्या व्यवस्थापनासोबत त्यांनी चर्चा केली. विद्यार्थ्यांवर कोणतेही बंधन लादू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान शाळेला नोटीस बजावली असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल आणि व्यवस्थापन व पाल क यांच्यातील वाद सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न करू, असे शिक्षणाधिकारी भारत बोरनारे यांनी सांगितले.
“आमच्या शाळेत असा कोणताही फतवा काढलेले नाही किंवा कसलेही अधिकृत निर्देश देण्यात आलेले नाहीत. येथे विविध धर्मांचे विद्यार्थी शिक्षण घेतात. ज्या तक्रारी आल्या आहेत त्याची योग्य ती चौकशी करून आवश्यक कारवाई केली जाईल.”
स्वप्नाली रानडे, संचालिका, के.सी. गांधी विद्यालय
Comments are closed.