‘एमडी’च्या ‘सुपर पॉवर’ची बाजी, रीत एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा उत्साहात
रीत क्रिएशन आणि रीत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत एमडी महाविद्याल याच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘सुपर पॉवर’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘मृत्यू मास्टर’ या एकांकिकेला द्वितीय तर नाट्यस्पर्श संस्थेच्या ‘प्रतिक्षायान’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावून बाजी मारली. रूपारेल महाविद्यालयाच्या ‘वेटर विदाऊट यू’ या एकांकिकेला विशेष लक्षवेधी म्हणून गौरवण्यात आले. सर्व विजेत्या कलाकारांचे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
गेल्या आठ वर्षांपासून आयोजक रेवा समेळ व रवींद्र समेळ यांनी रीत क्रिएशन आणि रीत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला महाविद्यालयीन गट आणि हौशी रंगकर्मीमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण 24 एकांकिकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे सहा एकांकिकांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. त्याचे परीक्षण प्रसिद्ध लेखक अंबर हडप आणि प्रसिद्ध लेखिका व अभिनेत्री संपदा जोगळेकर यांनी केले.
यांची विशेष उपस्थिती
महाअंतिम सोहळ्याला प्रसिद्ध सिनेअभिनेते जावेद जाफरी, अभिनेते समीर धर्माधिकारी आणि अभिनेत्री जाई खांडेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या पिढीतील कलाकारांना आपली कला सादर करण्याची, अनुभवी रंगकर्मीसमोर आपले कौशल्य दाखवण्याची आणि रंगभूमीच्या क्षेत्रातील नवे अनुभव घेण्याची संधी मिळाली.
Comments are closed.