ठाण्यात उभारणार पक्ष्यांचे घर; कोलशेतमध्ये 5.3 हेक्टर जागा, दहा कोटींचा निधी मंजूर

कोलशेतच्या पार्कसिटी गृहप्रकल्पात २०.५ एकर जागेवर ‘ग्रँड सेंट्रल पार्क’ला ठाणेकरांनी पसंती दिल्यानंतर आता याच परिसरात पक्ष्यांसाठी नवा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ठाण्यात पक्ष्यांचे घर तयार करण्यासाठी पालिकेकडून ५.३ हेक्टर जागा उपलब्ध करण्यात आली असून त्यासाठी तब्बल दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुर्मिळ पक्ष्यांचे निरीक्षण करणे, माहिती मिळवणे व त्यांचा अभ्यास करणे सोपे होणार आहे.

ठाणेकरांच्या मनोरंजनासाठी महापालिकेकडून वेगवेगळी उद्याने, खाडीकिनारी चौपाट्या उभारण्यात आल्या आहेत. याच संकल्पनेतून कोलशेत येथे २० एकर जागेवर ‘ग्रँड सेंट्रल पार्क’ देखील सुरू करण्यात आले. दरम्यान याच टाऊन पार्कच्या माध्यमातून मत्स्यालय, तारांगण, विज्ञान केंद्र आणि सेंद्रिय वनस्पती उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेकडून कोलशेत भागातील जागेच्या आरक्षण बदलाचा प्रस्तावदेखील तयार केला होता. त्याचपाठोपाठ आता पालिकेकडून पक्षीपालनगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विविध दुर्मिळ पक्षी एकाच छताखाली पाहण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे.

  • कोलशेत येथे ५.६८ हेक्टर शासकीय जमीन असून त्यापैकी ५.३ हेक्टर जागेवर पक्षीपालनगृह विकसित करण्यात येणार आहे.
  • प्रकल्पात उद्यान विकसित करणे, पक्ष्यांसाठी विशेष पिंजरे तयार करणे व इतर कामे करण्यात येणार आहेत.
  • पक्ष्यांना सुरक्षित आणि मोकळे ठेवण्यासाठी वरच्या बाजूला संपूर्ण जाळी बसवण्यात येणार आहेत.

देखभालीसाठी खासगी संस्था

पक्षीपालनगृहाची देखभाल व संचलनाचे काम खासगी संस्थेला दिले जाणार आहे. पक्षी आणणे, त्यांचे खानपान बघणे, त्यांच्यावर उपचार करणे, अशा विविध कामांची जबाबदारी या संस्थेकडे देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेचा एकही रुपया खर्च केला जाणार नाही. तसेच याठिकाणी प्रवेश शुल्क आकारले जाणार असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा महापालिकेला कसा मिळेल, या दृष्टिकोनातून पालिका प्रस्ताव तयार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Comments are closed.