महिलांच्या सक्षमीकरणाचा सरकारचा ढोल फुटला! शहापूरमध्ये गरिबी आणि भुकेकंगालीमुळे आईने पोटच्या तीन गोळ्यांना विष घालून मारले

राज्यातील महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या. त्यावर कोट्यवधी रुपये खर्चही केले. पण महिलांच्या या सक्षमीकरणाचा सरकारी ढोल अखेर फुटला आहे. शहापूर तालुक्यातील अस्नोली या गावात गरिबी आणि भुकेकंगालीमुळे आईने पोटच्या तीन गोळ्यांना विष घालून मारल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोस्टमार्टमच्या अहवालानंतर चिमुकल्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले असून निर्दयी मातेला किन्हवली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरून गेला आहे.
अन्नातून विषबाधा झाल्याने काव्या (10), दिव्या (8) आणि गार्गी भेरे (5) या तीन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र या मृत्यूचे खरे कारण आज समोर आले. संध्या भेरे असे या क्रूर मातेचे नाव असून न्यायालयाने तिला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहापूरच्या चेरपोली या गावामध्ये संदीप भेरे व त्याची पत्नी संध्या हे दोघेही तीन चिमुकल्या मुलींसह राहात होते. मात्र दोघांमध्ये बिनसल्याने ती गेल्या आठ महिन्यांपासून अस्नोली येथे माहेरी राहात होती. सोबत तिच्या मुलीदेखील होत्या.
घरची गरिबी आणि पतीपासून विभक्त राहात असल्याने संध्या भेरे ही पडघा येथील कंपनीत काम करीत होती. मात्र अतिशय तुटपुंजा पगार असल्याने मुलींचे शिक्षण कसे करणार, त्यांचे पालनपोषण कसे करायचे या चिंतेने तिला ग्रासले होते. गरिबीला कंटाळून अखेर संध्या हिने आपल्या तिन्ही मुली काव्या, दिव्या आणि गार्गी यांच्या जेवणामध्ये विषारी तणनाशक औषध टाकले. हे जेवण खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन तिघींचाही मृत्यू झाला.
तीनही दुर्दैवी मुलींचे वडील संदीप भेरे यांनी मुलींच्या आईवर संशय व्यक्त केला होता. किन्हवली पोलिसांनी त्यानंतर संध्या हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यात मुलींना सांभाळण्याचा कंटाळा आणि खर्चाचा ताण असह्य झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले.
तर्क-वितर्क आणि चर्चेला उधाण
तीनही पोटच्या गोळ्यांना विष घालून मारणार्या संध्या भेरे हिच्याबद्दल संपूर्ण शहापूर तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. ‘माता न तू वैरिणी’ असे म्हणत तिला कठोर शिक्षा करावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार हे अधिक तपास करीत आहेत.
Comments are closed.