ठाण्यातील नवरात्रोत्सवात दि.बा. जागर यात्रा; विमानतळाला आमच्या भूमिपुत्र नेत्याचे नाव दिले नाही तर याद राखा! आगरी, कोळी बांधवांची भक्कम एकजूट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव का दिले पाहिजे, यासाठी ठाणे शहरात दिबा जागर यात्रा काढण्यात आली आहे. भूमिपुत्रांमध्ये जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या यात्रेत विमानतळाला भूमिपुत्र नेत्याचे नाव दिले नाही तर याद राखा, असा इशारा आगरी, कोळी समाजाने सरकारला देत आपली भक्कम एकजूट दाखवली आहे. या यात्रेची सुरुवात घोडबंदर रोडवरील वाघबीळ गावातून झाली असून कोपरी, बाळकुम, कासारवडवली, कोळीवाडा, मोघरपाडा, ओवळा, भाईंदरपाडा, कळवा, ढोकाळी आदी ठिकाणीही यात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी मागचे पाच ते सहा वर्षे आंदोलन सुरू आहे, परंतु अद्याप विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाईल याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही.
  • या पार्श्वभूमीवर दिबांचे नाव विमानतळाला मिळावे यासाठी ठाण्यातील गावठाणे, कोळीवाडे आणि पाड्यांमधून एक ऐतिहासिक जनजागृती मोहीम सुरू झाली आहे.
  • ‘दिवा जागर यात्रा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेची सुरुवात घोडबंदर रोडवरील वाघबीळ गावातून झाली. भूमिपुत्र आणि समाजबांधव यांच्या सहभागातून ही यात्रा गावागावांत पोहोचणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या विशेष चर्चेत आहे. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आगरी कोळी भूमिपुत्र समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी बाईक रॅली काढत या समाजातील भावनांना वाट करून दिली. या आंदोलनानंतर कोळी समाज आणि स्थानिक भूमिपुत्रांनी दिबांच्या नावासाठी मोठा लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच ठाणे शहरात ही दिवा जागर यात्रा सुरू करण्यात आली आहे.

… तर दसऱ्यानंतर निर्णय घेणार

दिबांचे नाव देण्यासाठी नवी मुंबईत कृती समितीची बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप वेळ देण्यात आलेली नाही. जर आणखी काही दिवसांत वेळ मिळाली नाही तर दसऱ्यानंतर पुन्हा कृती समितीची बैठक होणार असून त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे, असे कृती समितीने जाहीर केले आहे.

व्यापक जनजागृती करणार

मंडळांच्या मार्गदर्शनानुसार या यात्रेतून दिबांच्या राजकीय तसेच सामाजिक कार्याची १० मिनिटांत माहिती दिली जाणार आहे. दिबांच्या नावाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती केली जाणार आहे. सर्व ठाणेकर भूमिपुत्रांचे चेंदणी कोळीवाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष कुणाल भोईर, मिलिना कोळी, हेमंत कोळी यांनी यात्रेत सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून यात्रेला शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.