चार हजार शेतकऱ्यांचा भात गेला कुठे? शहापुरातील 6 केंद्रांवर फक्त 66 हजार क्विंटल भात खरेदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

<<< नरेश जाधव

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी यासाठी राज्य शासन दरवर्षी आधारभूत खरेदी केंद्रांच्या माध्यमातून योग्य हमीभाव देऊन भात खरेदी करते. याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र यावर्षी सरकारने बळीराजाला फसवले आहे. शहापूर तालुक्यातील 8374 शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांवर भात विक्रीसाठी नोंदणी केली होती. मात्र अवघ्या 4374 शेतकऱ्यांचाच भात खरेदी केला. त्यामुळे 4 हजार शेतकऱ्यांचा भात गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हमीभाव केंद्रे वेळेत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना भात विकला असण्याची शक्यता आहे.

शहापूर तालुक्यातील फेब्रुवारी 2026 पासून भात खरेदी केंद्र सुरू झाले. आदिवासी विकास महामंडळाच्या 6 भात खरेदी केंद्रांवर 31 मार्चपर्यंत 5 हजार शेतकऱ्यांकडून 66 हजार 111 क्विंटल भात खरेदी केला. परंतु 8374 शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी आदिवासी महामंडळकडे ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त साडेतीन हजार आसपास शेतकऱ्यांनी आपला भात आदिवासी विकास महामंडळाला विक्री केला असल्याचे मंडळाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसते. याचाच अर्थ 4 हजार शेतकऱ्यांचा नोंदणी केलेला हजारो टन भात कुठे गायब झाला, असा प्रश्न पडला आहे.

भाताचा मोबदला तत्काळ मिळत नसल्याने व भात खरेदी संथ गतीने झाल्याने शेतकऱ्यांनी आपला भात परस्पर खासगी शेतकऱ्यांना विकला असल्याची शक्यता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहापूर तालुकाप्रमुख बाळा धानके यांनी व्यक्त केली. ज्या शेतकऱ्यांचा भात आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केला आहे. त्यांना लवकर मोबदला देण्याची मागणीही धानके यांनी केली आहे.

लहरी हवामानाचा फटका

शहापूर तालुक्यातील 80 टक्के शेतकरी भाताचे पीक घेतात. लहरी पावसामुळे कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. प्रत्यक्ष भाताचे उत्पादन व वाढलेले मजुरीचे दर आणि शासनाने जाहीर केलेली आधारभूत हमीभाव रक्कम यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. त्यातच भात खरेदी केंद्रे वेळेवर सुरू होऊन मोबदला मिळण्यास उशीर होत असल्याने शेतकरी आपली आर्थिक अडचण सोडवण्यासाठी कवडीमोल भावात आपला भात दरवर्षी खासगी व्यापाऱ्यांच्या घशात घालत आहेत.

Comments are closed.