धावत्या लोकलवर रॉड कोसळला; दोन प्रवासी गंभीर जखमी, खर्डी-उंबरमाळी रेल्वे मार्गावरील घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खर्डीहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या धावत्या लोकलवर ब्लास्टिंगचा ढिगारा व लोखंडी रॉड कोसळल्याने दोन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. खर्डी-उंबरमाळी रेल्वे मार्गादरम्यान ही घटना घडली. दरम्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. कोणत्याही प्रकारचा ब्लॉक न घेता हे काम केल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेप्रकरणी रेल्वेने तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर सध्या तिसऱ्या व चौथ्या लाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात येते. मंगळवारी कसाऱ्याकडे वेगाने लोकल जात असताना मोठा रॉड उडून तो थेट एका डब्यावर आदळला. तेथे दरवाजाजवळ उभे असलेले रोहित सारुक्ते (घोटी) व एकनाथ ठोंबरे हे दोघेही जखमी झाले. हा फटका एवढा जबरदस्त होता की, ठोंबरे हे तर थेट खाली कोसळले. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे.

आसनगावमध्ये गुन्हा दाखल

ड्रील मशीनने दगड फोडण्याचे काम सुरू असताना मशीनचे मोठे रॉड धावत्या लोकलवर पडल्याने हा अपघात झाला. एकनाथ ठोंबरे यांच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. ही घटना घडल्यानंतर रेल्वेकडून जखमींना कोणतीही मदत दिली नसून त्यांची साधी विचारपूसदेखील करण्यात आलेली नाही. या अपघातप्रकरणी आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.