कसारा ते खर्डी 14 किमीच्या मार्गिकचे लोकार्पण, ‘मरे’चा प्रवास होणार सुपरफास्ट
बहुप्रतिक्षेत कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेसह काम अंतिम टप्प्यात आहे. यातील कसारा ते खर्डी या 14 किमीच्या मार्गिकेचे लोकार्पण झाले. रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त गुरू प्रकाश यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. त्यामुळे आता मध्य रेल्वेचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
कल्याण-कसारा रेल्वेच्या तिसऱ्या मार्गाचे काम 2016 रोजी सुरू झाले. दहा वर्षांनंतर पहिल्या टप्प्यातील कसारा -खर्डी या 14 किमीच्या तिसऱ्या लाईनचे काम पूर्ण झाले असून या मार्गिकेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना, मुख्य अभियंता रिजवान अहमद, उपमुख्य अभियंता नजीम मुल्ला, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक बी. अरुणकुमार, वरिष्ठ अभियंता सचिन पांचाळ आदी उपस्थित होते.
15 डब्यांच्या लोकलची मागणी
खर्डी-दळखण रेल्वे फाटकावरील नियोजित उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरू करून येथील अडचण दूर करण्याची मागणी उपसरपंच भगवान मोकाशी यांनी यावेळी केली. तर खर्डी ते कल्याण हा टप्पादेखील लवकरात लवकर पूर्ण करून उपनगरीय वाहतूक सुरळीत सुरू ठेवून प्रवाशांचा त्रास कमी करावा व 15 डब्यांच्या लोकल ट्रेन लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी केली.
- पहिला 14 किमीचा टप्पा पूर्ण झाल्याने कसारा घाटातील वाहतूककोंडी सुटणार.
- लोकल वेळेत धावण्यास मदत होणार.
- तिसऱ्या मार्गिकचा दुसरा टप्पा खर्डी ते आसनगाव हा मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार.
- तिसरा टप्पा हा आसनगाव ते कल्याण हा डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Comments are closed.