Thane news – ‘गडकरी’त हिंदीत ‘निकास’.. मराठी भकास, रंगायतनमध्ये चोर पावलाने वादाची घुसखोरी
भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या नावाने उभारलेल्या आणि नूतनीकरण झालेल्या गडकरी रंगायतनमध्ये चोर पावलाने हिंदीचा प्रवेश झाला आहे. रंगायतन नाट्यगृहातून बाहेर पडताना दरवाजाजवळ चक्क हिंदीत ‘निकास’ असा ठसठशीत शब्द कोरण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ‘बाहेर ‘ऐवजी हिंदीतल्या ‘निकास’ शब्दाचा ‘प्रयोग’ केल्याने ठाणेकर रसिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आधीच राज्यात एकीकडे हिंदी सक्तीवरून रान पेटले असताना पालिकेतील अधिकारी ‘निकास’ शब्द जाणीवपूर्वक वापरून मराठी भकास करायला निघाले आहेत काय, असा सवाल विचारला जात आहे.
ऐतिहासिक ठाणे शहराची ओळख असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनचे ऑक्टोबर २०२४ पासून सुरू असलेले काम अकरा महिन्यांनंतर पूर्ण झाले आहे. ३१ कोटीहून अधिक निधीतून जुन्या वास्तूचे मजबुतीकरण आणि सौंदर्योकरण करण्यात आले आहे. हे नाट्यगृह सुरू करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ देणाऱ्या पालिका प्रशासनाने स्वातंत्र्यदिनी हे नाट्यगृह पुन्हा खुले केले.
गडकरी रंगायतन पुन्हा रसिकांच्या सेवेत रुजू झाल्याने एकीकडे आनंद व्यक्त होत असतानाच दुसरीकडे जिथून नाट्यरसिक बाहेर पडतात त्या दरवाजावर ‘बाहेर’ या मराठी शब्दाऐवजी चक्क हिंदीत ‘निकास’ असा शब्द लिहिला आहे. रंगायतनमधून बाहेर पडणाऱ्या दोन दरवाजावर ठसठशीतपणे ‘निकास’ असा उल्लेख करण्यात आला आहे. याआधी गडकरी रंगायतनमध्ये ‘आत’ आणि ‘बाहेर’ असे शब्द लिहिले होते.
अडगळीतील कोनशिला मिंध्यांना दिसल्या नाहीत का?
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते १९७८ मध्ये गडकरी रंगायतनचे उद्घाटन झाल्यानंतर कोनशिला उभारण्यात आली होती. दर्शनी भागात असलेल्या दोन्ही कोनशिला सध्या कोपऱ्यात गेल्या आहेत. दरम्यान, अडगळीतील कोनशिला मिंध्यांना दिसल्या नाही का? की फक्त राजकारणासाठी त्यांची नावे आठवतात? अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
गडकरी रंगायतनमध्ये ‘निकास’ हा शब्द वापरल्याने खरंच धक्का बसला आहे. निकास हा शब्द हिंदीत आहे. हा शब्द सर्वसामान्य रसिकांना समजणारा नाही. त्यामुळे तो शब्द काढून सोपा, साधा मराठी शब्द वापरावा.
अशोक बागवे (साहित्यिक)
‘आत’, ‘बाहेर’ हेच शब्द वापरा
भाषाप्रभू गडकरी या नावाने आपल्या रंगायतनची ओळख आहे. हे अभिजात भाषेचे वर्ष आहे. त्यामुळे आत, बाहेर असे मराठी शब्दप्रयोग केले तर स्वागतच आहे.
प्रवीण दवणे (ज्येष्ठ लेखक, कवी)
Comments are closed.