महायुतीत महाराडा! ठाण्यात मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेवकाने कानफटवले

भाजप व शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर आली असताना आता यांच्यातील वाद थेट मारामारीपर्यंत येऊन पोहोचला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी येथे भाजपच्या एका माजी नगरसेवकाने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या कानाखाली मारली. या प्रकरणी शिंदे गटाकडून नौपाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिंदे गटाचे कार्यकर्ते

बी एस यु पी च्या घरांची फी माफ केल्यानंतर शिंदे गटाचे हरेश महाडिक, महेश लहाने आणि काही लोक बीएसयूपीच्या इमारती खाली जाऊन जल्लोष करत होते. त्यावेळी भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार हे तिथे आले व त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दम द्यायला सुरुवात केली. ही फी माफी आमच्यामुळे झाली आहे, तुम्ही जल्लोष करू शकत नाही, असे पवार यांनी मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचे समजते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला व त्यानंतर पवार यांनी हरेश महाडिक, महेश लहाने यांच्या कानाखाली मारली.

आम्ही सर्व लक्ष्मी नारायण बिल्डिंग खाली उभे होतो तेव्हा नारायण पवार तीस चाळीस लोकांना घेऊन आले व त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली. त्यानंतर आमच्या कानाखालीही मारली. ते इतक्यावरच नाही थांबले त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकीही दिली, असे शिंदे गटाचा कार्यकर्ता महेश लहाने याने प्रसारमाध्यमांना सांगितलं.

Comments are closed.