ठाणे, रायगडात ‘दरडकळा’;मुंबई-नाशिक मार्गावर माती ढासळली, माथेरान घाटात दगड कोसळला

जोर पकडल्यानंतर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात दरडकळा सुरू झाल्या आहेत. दरड आणि डोंगर ढासळू लागल्याने संबंधित परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात मातीचा मलबा आणि झाडे अचानक रस्त्यावर आली. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. माथेरान घाटात महाकाय दगड थेट रस्त्यावर पडला. मात्र त्यावेळी सुदैवाने या ठिकाणी एकही वाहन नसल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. बोरघाट शिंग्रोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे अचानक घर कोसळले. मात्र या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही. कल्याणमध्येही घरांची भिंत कोसळली.

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर चांगला वाढला आहे. दरदिवशी पाऊस हजेरी ल ावत असल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात झिरो पाँईटजवळ अचानक झाडे आणि मातीसह दगड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊल ढिगारा हटवण्याचे काम हाती घेतले. या कालावधीत दोन्ही बाजूने जाणारी वाहतूक एकाच मार्गिकेवरून वळवण्यात आली.

कल्याणमध्ये सात घरांचे नुकसान
कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवरील घरांखालची माती घसरल्याने घराची भिंत कोसळल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आजूबाजूच्या सहा ते सात घरांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव पालि का प्रशासनाकडून या टेकडीवर बांधण्यात आलेल्या अनधिकृत घरावर हातोडा मारण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले.

पर्यटक बचावले
श्रावण महिन्यातील पहिला विकेण्ड असल्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची आज मोठी गर्दी होती. सकाळी नऊच्या सुमारास माथेरान घाटातील जुमापट्टी स्थानकाच्या बाजूला अचानक मोठा दगड रस्त्यावर कोसळला. पर्यटक ज्या ठिकाणी धबधब्याचा आनंद लुटत होते त्याच धबधब्याजवळ हा दगड पडला. जर हा दगड धबधब्याजवळ पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता. हा दगड 70 फूट उंचीवरून लोखंडी रेलिंग तोडून खाली आला.

घर कोसळताच ते पळाले
बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराच्या जवळ पुजाऱ्यांचे घर आहे. हे पुजारी गेल्या अनेक वर्षांपासून या घरात राहत होते. आज सुरू असलेल्या मुसळधार पावसात या घराच्या मागे असलेली दरड अचानक खाली आली. हा प्रकार पुजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ते घरातून बाहेर आले. त्यानंतर दरड घरावर कोसळल्यामुळे घर सपाट झाले. पुजारी प्रसंगावधान राखून बाहेर आल्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही.

Comments are closed.