नोकरदार महिलांना मिळणार हक्काचा निवारा, सुविधा भूखंडावर ठाणे महापालिका बांधणार वसतिगृह

नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांना आता ठाण्यात हक्काचा निवारा मिळणार आहे. भाईंदरपाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर यासाठी 9 मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय ठाणे पालिकेने घेतला आहे. या वसतिगृहात जवळपास 400 पेक्षा अधिक नोकरदार महिलांना राहता येणार आहे. अत्यंत माफक दरात महिलांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध होणार असून यासाठी केंद्राकडून 50 कोटींचा निधी मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहेत. त्याच बरोबर शहरात आयटी पार्क, खासगी कंपन्यांचे कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याने नोकरदार महिलांचा ठाणे शहरात ओढा वाढलेला आहे. दरम्यान, उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ठाणे नोकरीसाठी येणाऱ्या महिलांचा राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विधवा, घटस्फोटित आदी महिलांसह कुटुंबातील जवळचे कोणतेही सदस्य त्या शहरात नाहीत अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी ३0 टक्क्यांपर्यंत जागा आरक्षित राहणार आहेत.

इमारतीमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था, फुड कोर्ट, व्यायाम शाळेकरीता पुरेशी जागा अशा सुविधांचा अंर्तभाव असणार आहे. इमारतीचे बांधकाम क्षेत्र 4 हजार 523 चौ.मी. इतके असून इमारत बांधकामाकरीता एकूण 50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

महिलांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली वर्किंग वुमन हॉस्टेल योजना सुरू केली. व्यावसायिक कामामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सोयीस्कर निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी महिला वसतिगृह बांधण्यात येणार आहे.

Comments are closed.