तंजावरचे स्थलमहात्म्य – सरफोजी-तुकोजी-एकोजी

>> प्रा. समीर जाधव
[email protected]

‘अभिनव भोज’ अशी ख्याती असणारे तंजावरचे शहाजीराजे (द्वितीय) यांनी मोलाचे वाङ्मयीन कार्य केले. पुढे त्यांचे वारसदार सरफोजी राजे, तुकोजी राजे व एकोजी राजे यांनीही तंजावरच्या कला संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

शहाजीराजेंच्या (द्वितीय) अनेक भाषांतील काव्य, नाटक आणि त्यांच्या दरबारी कवींच्या रचनांनी तंजावरचे साहित्य समृद्ध केले आहे. त्यांचा कालखंड हा साहित्य, नाटय़, नृत्य, संगीत आदी कलांचा सुवर्णकाळ होता. शहाजीराजे (द्वितीय) यांचे त्यांच्या वाङ्मयीन कार्यासाठी आणि औदार्यासाठी तत्कालीन पंडितांनी ‘अभिनव भोज’ असे वर्णन केले आहे. 1712 साली वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षीच शहाजीराजे (द्वितीय) यांचे निधन झाले. त्या वेळी ते निपुत्रिक होते. म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा भाऊ सरफोजी (पहिले) हे तंजावरचे राजे झाले.

सरफोजी (पहिले) यांनी इ.स. 1712-1728 या काळात भाऊ तुकोजीराजेंच्या मदतीने तंजावरवर राज्य केले. सरफोजींच्या काळात कल्लनाईचे धरण मोडकळीस आले होते. मदुराईच्या नायकांनी ते दुरुस्ती करण्यापासून रोखले होते. परंतु सरफोजींनी (पहिले) आक्रमणाची धमकी दिल्यानंतर त्यांनी दुरुस्ती करण्याची परवानगी दिली. सरफोजी स्वतः धार्मिक आणि दानी होते. तसेच ते विद्वानही होते. त्यांनी राजदरबारात अनेक विद्वानांना आश्रय दिला. मात्र ते कठोर शिस्तप्रिय होते. सरकारी निधीचा बेकायदेशीर वापर त्यांना मान्य नव्हता म्हणूनच त्यांनी राजदरबारातील मंत्री कवी अय्यावयान याने केलेल्या निधीच्या बेकायदेशीर वापराबद्दल त्याला तुरुंगात डांबले. रामनाथपुरमच्या सरदाराचा तसेच मदुराईच्या नायकाचा त्यांनी पराभव केला. सरफोजींचा साताऱयाच्या एका कुटुंबातील मुलीशी विवाह झाला होता. 1728मध्ये सरफोजींचाही निपुत्रिक मृत्यू झाला आणि त्यांचा धाकटा भाऊ तुकोजी ऊर्फ तुळजाराजे (पहिले) यांनी 1728-1736 या काळात तंजावरवर राज्य केले. तुकोजीराजे (पहिले) हे संस्कृत, मराठी, तमिळ, पर्शियन या भाषांमध्ये पारंगत होते. त्यांनी तंजावरमध्ये पहिल्यांदाच हिंदुस्थानी पद्धतीचे गायन सुरू केले. तुकोजी (पहिले) हे सरफोजी (पहिले) यांच्यापेक्षा साहित्य आणि संगीत कलांमध्ये अधिक निपुण होते. घनश्याम पंडित, मल्हारी दास, सदाशिव दीक्षित असे काही कवी-कलावंत तुकोजीराजेंच्या दरबारी आश्रयास होते.

शहाजीराजेंप्रमाणेच तुकोजीराजेंवरही त्यांच्या दरबारातील कवींकडून अनेक पदे रचण्यात आली. त्यांच्या कारकीर्दीत ‘मारवा’ देशाच्या कारभारात तंजावरचा सहभागही दिसून येतो. तसेच त्यांनी त्रिचनापल्लीच्या राणी मीनाक्षीला चंदासाहेबांच्या विरोधात मदत केली. परंतु चंदासाहेबाने विश्वासघात करून त्रिचनापल्लीची सत्ता काबीज केली. तंजावरच्या शेजारची मदुराई आणि त्रिचनापल्ली ही दोन्ही संस्थाने मुस्लिमांच्या ताब्यात गेली. त्यामुळे तंजावरच्या मराठी राज्यास धोका निर्माण झाला. त्याच वेळी एक चेट्टी (श्रेष्ठ व्यापारी) दिवाण पदावर होता आणि त्याचेच वर्चस्व तंजावरच्या राजकारणावर होते. परंतु त्याच्या काही धोरणामुळे प्रजेमध्ये असंतोष निर्माण झाला. अशा असंतोषपूर्ण वातावरणातच तुकोजीराजेंच्या राजवटीचा शेवट झाला. तुकोजीराजे (पहिले) यांच्या मृत्यूनंतर तंजावरच्या गादीच्या ‘वारसा हक्का’विषयी प्रश्न निर्माण झाले.

तुकोजीराजेंनंतर त्यांचा मोठा मुलगा व्यंकोजी/ एकोजी (दुसरे) ऊर्फ बाबासाहेब भोसले हे इ.स.1736 साली तंजावरच्या गादीवर बसले. त्यांनी केवळ एकच वर्ष राज्य केले. आपल्या पूर्वसुरींप्रमाणेच ते विद्वान होते. मराठी, तेलुगू, संस्कृत या भाषांमध्ये ज्ञानी होते. संगीत आणि साहित्य कलेमध्ये निपुण होते. तसेच ते लढवय्या होते. इ.स. 1736 सालीच चंदासाहेबाने तंजावरवर स्वारी केली. यावेळी एकोजींनी लष्कराची सूत्रे हाती घेतली आणि चंदासाहेबाची स्वारी परतून लावली. मात्र या लढाईचा तंजावरच्या खजिन्यावर परिणाम झाला. अशा अस्थिर राजकीय परिस्थितीत राज्याची घडी नीट बसावी म्हणून त्यांनी एक मंत्रिमंडळ नेमले. परंतु या मंत्रिमंडळालाही काही मार्ग काढता आला नाही. इ.स. 1737 साली व्यंकोजी/ एकोजीराजे (दुसरे) यांचा मृत्यू झाला.

(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)

Comments are closed.