तंजावरचे स्थलमहात्म्य – मराठाकालीन चित्रकला
>> प्रा. समीर जाधव ([email protected])
सोनेरी वर्ख असलेली लाकडावरील चित्रे तसेच भिंतींवर काढलेली भव्य चित्रे हे भोसलेकालीन, मराठाकालीन चित्रशैलीचे मुख्य वैशिष्टय़. वास्तुकलेचा एक भाग किंवा सजावटीचा घटक म्हणून वापरली जाणारी ही चित्रे तंजावरमधील प्राचीन मंदिरांच्या सजावटीचाही प्रमुख भाग होती. ‘तंजावरची चित्रशैली’ या मागील लेखामध्ये तंजावरमध्ये आविष्कृत झालेल्या चित्रशैलीचे विवेचन आपण केले. आजच्या लेखात भोसलेकालीन, मराठाकालीन चित्रशैलीच्या इतर विशेषांचा आढावा घेऊ.
सोनेरी वर्ख असलेली लाकडावरील चित्रे भोसले काळात लोकप्रिय झाली. त्याचप्रमाणे याच काळात भिंतींवर काढलेली चित्रेही अधिक लोकप्रिय झालेली दिसतात. याची उदाहरणे बृहदीश्वर मंदिर आणि राजवाडय़ामध्ये पाहायला मिळतात. तसेच बृहदीश्वर मंदिरातील कार्तिकेय देवळासमोरील भिंत, तंजावर येथील तंजापुरीश्वर मंदिर, ओरथानाड येथील मुक्तांबळ छत्रम (सरफोजी द्वितीयच्या आवडत्या उपपत्नीच्या नावावरून ठेवलेले), तिरुवैयारू येथील कल्याण महाल आणि इतर ठिकाणांचा समावेश आहे. काशी (बनारस) यात्रेवरून परतल्यावर सरफोजी राजेंनी बांधलेल्या ‘तिरुवैयारू छत्रम’मध्ये भिंतींवरील उत्तम चित्रांची पुसटशी चिन्हे आढळतात. या छत्रममधील चित्रे कदाचित सर्वात सुंदर असावीत. कारण त्यात आरशाचे तुकडेही जडवलेले होते. तंजापुरीश्वर मंदिरातील उत्कृष्ट चित्रे भोसले काळातच काढलेली आहेत. मात्र नंतरच्या काळात त्यावर रंगकाम केल्यामुळे ती चित्रं झाकली गेली. मराठा शैलीतील चित्रे आकाराने भव्य आहेत आणि ती प्रामुख्याने वास्तुकलेचा एक भाग किंवा सजावटीचा घटक म्हणून वापरली जात होती.
मराठाकालीन भित्तिचित्रांमध्ये धार्मिक आणि लौकिक अशा दोन्ही प्रकारच्या विषयांचा समावेश होता. धार्मिक विषयांमध्ये हिंदू देवदेवतांची चित्रे आहेत, तर लौकिक विषयांमध्ये राजघराण्यातील व्यक्तींची चित्रे प्रामुख्याने दिसतात. भित्तिचित्रांमध्ये देवता एका कमानीच्या छत्राखाली, चमकणाऱ्या स्तंभांवर सिंहासनावर बसलेल्या दाखवल्या आहेत. अंतर्गत सजावटीच्या इतर वस्तूंमध्ये उश्या, झुंबरं, चिंट्झचे पडदे, स्टूल, बाक आणि गालिचे यांचा समावेश आहे. भित्तिचित्रांसाठी कलाकारांनी वनस्पतीजन्य रंगांचा वापर केला, त्यात पांढरा, लाल, हिरवा, निळा आणि निळसर जांभळा हे सर्वाधिक लोकप्रिय होते. तसेच सर्वत्र सोन्याचाही भरपूर वापर केला होता.
मोठ्या रिकाम्या भिंती सजवण्याचा दुसरा कोणताही प्रयत्न केला गेला नसल्यामुळेच भोसले काळात भित्तिचित्र अधिक प्रमाणात काढण्यात आली असे म्हणता येईल. भोसले / मराठा काळात छतावरील देवतांची चित्रे आकाराने अत्यंत भव्य आहेत. तंजापुरीश्वर मंदिरात एका दुर्मिळ रचनेत कलाकाराने मराठा काळात अज्ञात असलेले चैतन्य आणि सहजता साधली आहे. भोसले काळात तंजावरमध्ये भित्तिचित्रांच्या बरोबरीने काचेवरील चित्रकलाही लोकप्रिय झाली. काही अभ्यासकांच्या मते तिचा शोध याच काळात म्हणजे राजा सरफोजी दुसरे यांच्या काळात लागला. लाकडावरील चित्रकला तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च पाहता काचेवरील चित्रकला हा एक स्वस्त आणि जलद पर्याय मानला जात असे. यामध्ये काचेच्या मागील बाजूस तंजावर चित्रकलेतीलच आकृतिबंध वापरून चित्र काढले जात असे. रत्ने किंवा खडे जडवण्याऐवजी चित्रातील काही भाग रंगविण्याविना तसाच सोडला जाई आणि दागिन्यांचा आभास निर्माण करण्यासाठी काचेच्या मागील बाजूस धातूच्या ठोकून तयार केलेल्या पट्ट्या (beaten metal strips) चिकटवल्या जात असत.
सरफोजी राजे (दुसरे) यांच्या काळात तंजावरच्या सर्वच क्षेत्रांत आधुनिकीकरण झाले. त्यामध्ये चित्रकलेतही आमूलाग्र बदल होते गेले. भिंतीवर थेट चित्र काढण्याऐवजी लाकडी फळ्यांवर पसरवलेल्या कापडावरही चित्रे काढून आणि ती चित्रे भिंतीवर टांगून प्रदर्शित केली जाऊ लागली. हे वाढत्या पाश्चात्त्यीकरणाचे लक्षण होते. सरफोजी राजे (दुसरे) यांनी आपल्या दरबारातील सभागृहात पूर्वजांची चित्रे लावून सजावट केली होती. त्यातील अनेक चित्रे आजही राजवाडय़ात आहेत, तर काही चेन्नई येथील सरकारी संग्रहालयात आहेत. तंजावरमध्ये अशी भोसलेकालीन व्यक्तिचित्रे (portraits) मोठय़ा संख्येने उपलब्ध असूनही त्यांचा अभ्यास तुलनेने कमी झाला आहे.
तंजावरचे शेवटचे राजे शिवाजी दुसरे यांच्या काळातच सर्वच कलाकारांचा राजाश्रय संपुष्टात आला आणि तंजावरमधील कलेच्या सुवर्णयुगास उतरती कळा लागली. असे असले तरी कलात्मक तंजावर ही तंजावरची ओळख पुसली गेली नाही.
(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)
Comments are closed.