थरूर यांनी AI परिषदेचे कौतुक केले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘एआय जागतिक प्रभाव’ परिषदेची प्रशंसा केली आहे. यासंदर्भात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणांशी विसंगत भूमिका घेतली आहे. काँग्रेसने या परिषदेला विरोध करण्याची भूमिका घेतली असून त्यामुळे पुन्हा त्यांचे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी बिनसले आहे.
शशी थरुर हे अनेकदा काँग्रेसच्या पारंपरिक भूमिकेच्या विरोधात जाऊन आपले स्वतंत्र विचार मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी यापूर्वी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची स्तुती करून काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा राग ओढवून घेतला आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. या भेटीत सारे मतभेद दूर झाल्याचा दावा नंतर करण्यात आला होता. तसेच, थरुर हे केरळमध्ये येत्या एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवणुकीत काँग्रेसचे नेतृत्व करतील, अशी भाषा केली जात होती.
पुन्हा वादाला निमंत्रण
आता पुन्हा थरुर यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. काँग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी एआय परिषदेच्या परिसरात शिरुन आपले शर्ट काढून आंदोलन केले होते. मात्र थरुर यांनी ही परिषद आणि तिचे आयोजन यांचे कौतुक केल्याने पुन्हा काँग्रेसअंतर्गत वादाची ठिणगी पडण्याचा संभव आहे. थरुर यांनी शुक्रवारी या एआय परिषदेत भाषणही केले. त्यांनी भारताच्या या प्रयत्नाची स्तुती केली. ही परिषद हे भारताचे जागतिक स्तरावर मिळविलेले मोठे यश आहे, अशी भलावण त्यांनी भाषणात केली आहे.
भारताच्या प्रस्तावांना मान्यता
या परिषदेचे औपचारिक उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. परिषदेच्या प्रथम दिवशी भारताने मांडलेल्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी पॅरिस येथे परिषद झाली होती. त्या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि त्याला नियमबद्ध करण्याची प्रक्रिया, यांच्या संदर्भात मोठे मतभेद निर्माण झाले होते. तथापि, भारतात आता होत असलेल्या परिषदेत बऱ्याच मुद्द्यांवर सदस्य देशांचे एकमत झाल्याचे दिसून येत आहे. या परिषदेत एकंदर 119 देशांनी भाग घेतला आहे. जगातील बहुतेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेसाठी आले आहेत. अमेरिकेचे प्रतिनिधित्व त्या देशाचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी केले आहे. अनेक देशांचे प्रमुख नेते आणि अनेक जागतिक एआय कंपन्यांचे प्रमुख अधिकारीही या परिषदेला उपस्थित आहेत. ही परिषद 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आधी ती 20 फेब्रुवारीला संपणार होती. तथापि, तिचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
Comments are closed.